भरणे महामार्ग उड्डाणपूलाच्या भिंतीवर साकारतेय 'शिवसृष्टी'

May 25, 2024 - 12:38
 0
भरणे महामार्ग उड्डाणपूलाच्या भिंतीवर साकारतेय 'शिवसृष्टी'

खेड : तळ कोकणाचे प्रवेशद्वार अशी ओळख जपणारा खेड तालुका आहे. या प्रवेशद्वाराजवळ भरणे येथे तत्कालीन आमदार व शिवसेना नेते रामदास कदम यांनी उभारलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा आता जिल्ह्याच्या प्रमुख ओळखीमध्ये समाविष्ट आहे. त्याच पुतळ्याच्या परिसरात राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात उड्डाण पूल बांधण्यात आला. त्या लगत असलेल्या उड्डाण पुलाच्या भिंतीवर सध्या चित्र रेखाटत असून त्याद्वारे शिवसृष्टी येथे साकारण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगासाठी शौर्याचे प्रतीक आहेत. त्यांच्या जीवन चारित्र्याचा अभ्यास जगभर सुरू आहे. राजे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. माजी मंत्री आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा भरणे येथे उभारुन त्यांना कोकणवासीयांच्या वतीने मानाचा मुजरा केला. त्याच पुतळ्या लगत महामार्गाच्या उड्डाणपुलाच्या भिंतीवर आता कलाकार छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील प्रमुख घटना व प्रसंगांवरआधारित तैलचित्रे साकारत आहेत. ही चित्रे महाराजांचा इतिहास मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात येणाऱ्यांना जाणून घ्यायला नक्की प्रेरणा देतील. चित्रकारांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे बालपणापासून सवंगड्यासमवेत जमून स्वराज संकल्पना सांगणारे व स्वराज्याची शपथ घेणारे बाल शिवराय, युद्ध कला शिकताना शिवराय, बाजी प्रभू, अन् स्वराज्यासाठी गनिमीकावा करून शत्रूला धूळ चारणारे युद्ध करणारे मावळे, राजमुद्रा, रायगड मेणा दरवाजा आदी चित्रे मनमोहक रंगसंगतीत रेखाटली आहेत. अनेकांची पावले उड्डाण पुलाच्या भिंतीकडे लक्ष गेल्यावर भरणे परिसरात थांबतात. या चित्रांमुळे पूर्वी केवळ एक नाका अशी ओळख असलेल्या भरणे परिसराला शिवसृष्टीचे रूप प्राप्त झाले आहे.

रेखाटलेल्या चित्रातून छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास आबाल वृद्धांपासून ते भावी पिढीला प्रेरणा देणारा ठरणार आहे. यामुळे गडकोट वाचवा ही मोहीम देखील गतिमान व्हावी याकरिता चित्रकारांनी जणू काही शिवप्रेमींना साद देखील घातली आहे.

मे महिन्यातील रणरणत्या उन्हात चित्रकार त्यांच्या कुंचल्यातून ही चित्रे साकारत आहेत. हे काम १५ जून पर्यंत सुरू राहणार आहे. चित्रकार सकाळी ७ ते रात्री १२ वाजेपर्यंत या ठिकाणी काम करत असून, पुढील किमान तीन वर्षे ही चित्र टिकतील अशा पद्धतीने रेखाटण्यात येतं आहेत. तीन वर्षांनी या चित्रांना रंगाचा दुसरा हात देखील देण्यात येणार आहे.
खेड, मंडणगड, चिपळूण, राजापूर, रत्नागिरी, महाड येथील चित्रकार येथे काम करत आहेत. त्यामध्ये ठेकेदार निशांत वाघे, चित्रकार विशाल गुरव व अन्य बारा जणांचा समावेश आहे.

चित्रांचा अवमान होऊ नये : वैभव सागवेकर
भरणे येथे साकारलेली चित्रे ऐतिहासिक असून परिसरातील शोभा वाढवणारी आहेत. उड्डाण पुलाच्या भिंतीवर कोणीही गुटखा खाऊन धुंकणे, कचरा टाकणे किंवा अन्य कोणतीही अशी कृती ज्याने अवमान होईल असे कृत्य करताना व्यक्ती आढळल्यास त्यावर कडक कारवाई केली जाईल. या चित्रांचा अपमान होणार नाही याची दक्षता नागरिकांनी घ्यावी. कोणत्याही राजकीय पक्षांनी या भिंतीवर आपले बॅनर लावू नये, अशी अपेक्षा सामाजिक कार्यकर्ते वैभव सागवेकर यांनी व्यक्त केली आहे.

भरणे उड्डाणपूल आंबवली बाजूला कोकण संस्कृती
भरणे येथील महामार्गाच्या आंबवली बाजूला उड्डाणपूल परिसरात भिंतीवर कोकणातील लोककला संस्कृती दर्शवणारी चित्र रेखाटण्यात आली आहेत. त्यामध्ये दशावतार, शिमगोत्सव, पालखी नाचवणे, रसाळगड आदी चित्रांचा समावेश आहे.


दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:03 PM 25/May/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow