चिपळुणातील पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक : खासदार नारायण राणे

Sep 18, 2024 - 11:25
 0
चिपळुणातील पूर नियंत्रणासाठी लवकरच बैठक :  खासदार नारायण राणे

चिपळूण : चिपळुणातील पूर नियंत्रणावर मोठे काम करायचे आहे. त्यासाठी प्रशासनाने जो अहवाल तयार केला आहे तो मागवून घेऊन लवकरच त्या संदर्भात अनंत चतुर्दशीनंतर बैठक आयोजित करणार आहे. तसे जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे. येथे रोजगाराचा मोठा प्रश्न असून त्यासाठी फळ प्रक्रिया तसेच औषधी वनस्पती प्रक्रिया असे उद्योग आणण्यासाठी प्रयत्न करणार असल्याची माहिती खासदार नारायण राणे यांनी येथे दिली.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघाचे खासदार नारायण राणे रविवारी चिपळूण दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर सार्वजनिक गणेशोत्सवाच्या ठिकाणी भेट देऊन दर्शन घेतले. भाजप पदाधिकाऱ्यांकडे काही विषयांवर चर्चा केल्यानंतर खासदार राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. नितीन गडकरी यांच्या वक्तव्यावर ते म्हणाले की, नितीन गडकरी हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी केलेले वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक मत होते की, राजकीय याबाबत मला काहीही माहिती नाही. त्यामुळे मी त्या विषयावर अजिबात बोलणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना फक्त २ दिवस मंत्रालयात गेले. त्यांना अर्थसंकल्पदेखील कळत नाही. अशा माणसावर मी बोलणार नाही. यापुढे त्यांच्याबद्दल मला प्रश्न विचारू नका.

रिफायनरीसाठी प्रयत्न सुरूच 
मतदारसंघाच्या विकासाबाबत खासदार राणे म्हणाले की, विकास करायचा असेल तर सर्वप्रथम रस्ते सुस्थितीत असणे आवश्यक आहेत. त्यामुळे मी सर्वप्रथम येथील महामार्ग चौपदरीकरण आणि जोडरस्ते याकडे लक्ष केंद्रित केले आहे. संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि जिल्हाधिकारी यांची एक संयुक्त बैठक घेणार आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांना कोणत्याही परिस्थितीत विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही तसेच रिफायनरीसाठी माझे प्रयत्न नेहमीच सुरू राहतील, त्याबद्दल मी सकारात्मक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:53 AM 18/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow