देवीहसोळचे कातळशिल्प राजापूरचे सौदर्य; जागतिक वारसास्थळ यादीत समावेश

Sep 18, 2024 - 14:47
 0
देवीहसोळचे कातळशिल्प राजापूरचे सौदर्य; जागतिक वारसास्थळ यादीत  समावेश

राजापूर : रत्नागिरी येथील निसर्गयात्री संस्थेच्या पाठपुराव्याने संचालक, पुरातत्त्व विभाग महाराष्ट्र शासन, सांस्कृतिक कार्य मंत्रालय महाराष्ट्र यांच्या विशेष प्रयत्नातून युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळ प्रस्तावित यादीमध्ये नऊ ठिकाणांचा समावेश करण्यात आला आहे. यात देवीहसोळ येथील ठिकाणाचा समावेश आहे. आकाराने सर्वात मोठ्या आणि आश्चर्यकारक कातळ शिल्प (Katal Shilp Konkan) रचनांचा समावेश असलेले आणि एवढ्या मोठ्या संख्येने एकाच ठिकाणी कातळशिल्प आढळणारे देवीहसोळ हे बहुधा एकमेव गाव आहे.

एकाच परिसरातील कातळशिल्प निर्मितीतील विविध पद्धतीचे हे उत्तम नमुने अश्मयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे पुरावे मानले जात आहेत. निसर्गसंपदेने नटलेल्या देवीहसोळ गावचा (Devihasol Rajapur) सडा परिसर, निसर्ग आणि मानवी अभिव्यक्तीचा अनोखा संगम याचा आढावा घेणारी मालिका राजापूर तालुक्यातील देवीहसोळ येथील आर्या दुर्गा मंदिरानजीक असलेले पटसदृश्य कातळशिल्प आणि परिसराचा समावेश जागतिक वारसा स्थळ प्रस्तावित यादीमध्ये केला आहे. ही तालुक्यासाठी अत्यंत गौरवाची बाब आहे. जागतिक पटलावर आलेल्या देवीहसोळ गावच्या सड्यावर तब्बल तीनशेहून अधिक विविध कातळशिल्प आहेत.

तालुक्यातील देवीहसोळ हे मुचकुंदी आणि बेनी या नद्यांच्या संगमावर वसलेले गाव. गावाला निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे. या वैभवात भर घालणारी मुचकुंदी नदी एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला ऋतुमानानुसार विविध रूपे दाखविणारा विस्तीर्ण सडा अशी वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक रचना या गावाला लाभलेली आहे. गावच्या सड्यावर ग्रामदेवता जाकादेवी आणि आर्यादुर्गा देवीचे मंदिर असून हे देवस्थान रत्नागिरी जिल्ह्यासह राज्यभरामध्ये प्रसिद्ध आहे. या मंदिरालगतच भलेमोठे पटसदृश कातळशिल्प असून सुमारे २४ फूट लांब व जवळपास तेवढीच रुंद, अत्यंत ठसठशीत, उठावाचे चित्र असावे असा भास निर्माण करणारी आणि आपल्या तर्क शक्तीला आव्हान देणारी ही चित्र रचना अनोखी आहेत.

याच्याच बाजूला मगर, खेकडा, हॅमर हेड मासा, हत्ती, शिंग सदृश रचना आणि काही सांकेतिक रचना असा साधारण १५ चित्र रचनांचा समूह आढळून येतो. निसर्गयात्री संस्थेचे संशोधक सुधीर रिसबुड, धनंजय मराठे, प्रा. सुरेंद्र ठाकूरदेसाई आणि सहकाऱ्यांनी कातळशिल्पांच्या सुरुवातीच्या केलेल्या संशोधनामध्ये देवीहसोळ गावातील अनेक वैशिष्ट्यपूर्ण अशी कातळशिल्प प्रकाशात आली. संशोधनानंतर या टीमचे दहा वर्ष या परिसरातील कातळशिल्पांचे संशोधनाचे काम सुरू आहे.

देवीहसोळ गावच्या सड्याच्या सुमारे तीन चौरस किमी परिसरात सुमारे पंधरा ठिकाणी आढळून आलेल्या तिनशेहून अधिक चित्र वैशिष्ट्यपूर्ण रचना स्वतःचे वेगळेपण जपणाऱ्या आहेत. या बाबी या भागात अश्मयुगीन मानवाचे दीर्घकाळ वास्तव्य होते हे निर्देश करत असल्याचे सांगितले जात आहे. त्यादृष्टीने या सर्वांचे समग्र दस्तऐवजीकरण, सखोल संशोधन प्रक्रिया चालू असल्याची माहिती निसर्गयात्री संस्थेचे सुधीर रिसबुड यांनी दिली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:09 PM 18/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow