रत्नागिरीच्या दोन्ही राजांना वाजत-गाजत निरोप

Sep 19, 2024 - 10:47
Sep 19, 2024 - 10:59
 0
रत्नागिरीच्या दोन्ही राजांना वाजत-गाजत निरोप

रत्नागिरी : रत्नागिरीतील मानाचे आणि नवसाला पावणारे गणपती म्हणून ओळखल्या जाणाºया मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजा आणि आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजा या दोन्ही गणपतींना बुधवारी भावपूर्ण निरोप देण्यात आला. दोन्ही राजांच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये रत्नागिरीकर मोठ्या भक्तीभावाने सहभागी झाले होते. अगदी वाजत-गाजत अशी मिरवणुक काढून दोन्ही राजांचे रात्री उशिराने विसर्जन करण्यात आले.

ढोल, ताशे, बेंजो, झांज पथक आदी वाद्यांच्या गजरात आणि फटक्यांच्या आतषबाजीत या मिरवणूका निघाल्या होत्या. आठवडा बाजार येथील रत्नागिरीचा राजाच्या मिरवणुकीत मंडळाचे पदाधिकारी यांच्यासह अनेक राजकीय पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

मारूती मंदिर येथील श्री रत्नागिरीचा राजाच्या विसर्जन मिरवणुकीत ना. सामंत यांच्यासह श्री रत्नागिरीचा राजा मंडळाचे अभिजित गोडबोले, यांच्यासह सर्व पदाधिकारी सहभागी झाले होते. दोन्ही मिरवणुकांना सायंकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास प्रारंभ झाला. या दोन्ही राजांच्या मिरवणुका पाहण्यासाठी रत्नागिरीकरांनी मोठी गर्दी केली होती. सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास रत्नागिरी राजाची मिरवणुक रामआळीत तर श्री रत्नागिरीचा राजाची मिरवणुक एसटी स्टॅण्ड येथे होती. दोन्ही मिरवणुका फारच आकर्षक पद्धतीने मार्गक्रमण करत होत्या. दोन्ही मिरवणुकांमधील मार्गांमध्ये वाहतुकीची कोंडी होऊ नये म्हणून वाहतुक पोलीसांनी तसेच कार्यकर्त्यांनी नियोजन केले होते. तसेच दोन्ही मिरवणुका शांततेत पार पडव्यात म्हणून दोन्ही मंडळातील पदाधिकारी काळजी घेत होते. रात्री उशीरा दोन्ही राजांचे विसर्जन करण्यात आले.

यापूर्वी शुक्रवारी अनंत चतुर्थीला जिल्ह्यातील जवळपास ३६ हजार बाप्पांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर या असा जयघोष करीत वाजत-गाजत आणि मिरवणुकांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला. विसर्जनासाठी रत्नागिरीतील समुद्र किनाºयांवर आणि विसर्जन तलावांवर भाविकांनी गर्दी केली होती.

जयगडच्या राजालाही निरोप
जयगडच्या राजालाही निरोप देण्यात आला. मागील काही वर्षांपासून जयगडचा राजा मित्रमंडळाकडून जयगड-संदखोल येथे जयगडच्या राजाची प्रतिष्ठापना करण्यात येते. उत्सव काळात धार्मिक तसेच मनोरंजनाचे कार्यक्रम घेण्यात येतात. यावर्षीदेखील विविध कार्यक्रमांनी उत्सव साजरा करण्यात आला. शनिवारी दुपारी तीन वाजता संदखोल फाटा येथून जयगडच्या राजाची विसर्जन मिरवणुक सुरू झाली. वाजत-गाजत निघालेली विसर्जन मिरवणुक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:13 19-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow