चिपळुणात गणरायाला जल्लोषात निरोप

Sep 19, 2024 - 10:58
 0
चिपळुणात गणरायाला जल्लोषात निरोप

चिपळूण : गेले दहा दिवस भक्तांच्या घरी मुक्कामाला असलेल्या गणरायाने अनंत चतुर्दशीच्या दिवशी भावपूर्ण वातावरणात निरोप घेतला. चिपळूण परिसरात चार हजार घरगुती तर तेरा सार्वजनिक गणेशमूर्तीचे विसर्जन विविध ठिकाणी करण्यात आले. मंगळवारी सायंकाळपासून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्ती विसर्जनासाठी शोभायात्रेने बाहेर पडल्या.

सायंकाळी ५ नंतर घरगुती गणेशमूर्ती विसर्जनासाठी गणेश घाटांवर भाविकांनी गर्दी केली होती. चिपळूण शहर परिसरात सुमारे १३ सार्वजनिक व ४ हजार घरगुती गणेशमूर्तीचे विसर्जन मंगळवारी रात्री उशिरापर्यंत सुरू होते. प्रामुख्याने सार्वजनिक गणेशमूर्ती विसर्जन मिरवणूक रात्री १२ पर्यंत सुरू होत्या. यावेळी चिपळूण नगर परिषदेपासून पुढे मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला. या दरम्यान एक दिशा मार्गाचे नियमन करण्यात आले. शहरातील नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठ, विसर्जन घाटापर्यंत मिरवणूक पाहण्यासाठी उपस्थित होते.

सायंकाळी ६ वा. चिपळूण शहरातील श्री देव सार्वजनिक गणेश मंडळाची गणेश मूर्ती ढोल-ताशाच्या गजरात विसर्जनासाठी बाहेर पडली. त्यानंतर पाठोपाठ सांस्कृतिक केंद्रानजिकच्या मैदानावरील नवसाचा चिपळूणचा राजा मंडळाची मिरवणूक सुरू झाली. पाठोपाठ चिपळूणचा महाराजा तसेच नगर परिषद सार्वजनिक गणेश मंडळ, भाजी मंडई, सर्वात शेवटी राहुल गार्डनचा महाराजा आदी सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्ती शोभायात्रा व ढोल-ताशाच्या गजरात, फटाक्यांच्या आतषबाजीत निघाल्या. नाईक कंपनी बाजार पूल परिसरापर्यंत ही मिरवणूक नेण्यात आली. या ठिकाणी पुजेच्या लहान मूर्तीचे विसर्जन करण्यात आले तर मोठ्या मूर्ती नाथ पै चौक मार्गे गांधारेश्वर विसर्जन घाटावर नेऊन त्यांचे विसर्जन करण्यात आले. यावेळी चोख पोलिस बंदोबस्त होता.

वाशिष्ठी मिल्क अॅण्ड मिल्क प्रॉडक्टसूच्या माध्यमातून चेअरमन प्रशांत यादव, मुख्य प्रवर्तक स्वप्ना यादव यांनी मिरवणूकी दरम्यान पुष्पवृष्टी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 19/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow