'कोमसाप'तर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

Sep 20, 2024 - 14:45
 0
'कोमसाप'तर्फे वाङमयीन पुरस्कारासाठी साहित्य पाठविण्याचे आवाहन

मालगुंड : कोकण मराठी साहित्य परिषदेतर्फे कोकणातील सभासद साहित्यिकांना विविध वाङमयीन व वाङमयेतर पुरस्कार प्रतिवर्षी दिले जातात. सन २०२३ - २४ साठी घोषित होणाऱ्या वाड्मयीन पुरस्कारासाठी पुस्तके मागविण्यात येत आहे.

हे सर्व पुरस्कार कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कोकणातील सभासद असणाऱ्या लेखकांसाठी आहेत.

या पुरस्कारांमध्ये प्रथम श्रेणीचे अकरा पुरस्कार, द्वितीय श्रेणीचे पाच, विशेष श्रेणीचे तीन पुरस्कार आणि वाड्मयेतर बारा पुरस्कार दिले जाणार असून, यापैकी प्रथम श्रेणीच्या पुरस्कारासाठी पाच हजार रुपये, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि द्वितीय व विशेष पुरस्कारासाठी प्रत्येकी तीन हजार, सन्मानचिन्ह, सन्मानपत्र प्रदान केले जाणार आहे.

यामध्ये प्रथम श्रेणी पुरस्कारात र. वा. दिघे कादंबरी पुरस्कार, वि. सी. गुर्जर कथासंग्रह पुरस्कार, आरती प्रभू कविता संग्रह पुरस्कार, धनंजय कीर स्मृती आत्मचरित्र पुरस्कार, श्रीकांत शेट्ये स्मृती चरित्र पुरस्कार, प्रभाकर पाध्ये स्मृती समीक्षा पुरस्कार, भाई भगत चित्रपट - नाट्य - विषयक पुरस्कार, अनंत काणेकर ललित गद्य पुरस्कार, प्र. श्री. नेरुरकर स्मृती बालवाड्.मय पुरस्कार, वि. कृ. नेरुरकर स्मृती संकीर्ण पुरस्कार, फादर स्टीफन सुवार्ता वैचारिक पुरस्कार यांचा समावेश आहे. तर विशेष पुरस्कारामध्ये वि. वा. हडप स्मृती कादंबरी पुरस्कार, विद्याधर भागवत स्मृती कथासंग्रह पुरस्कार, वसंत सावंत स्मृती कविता पुरस्कार, अरुण आठल्ये स्मृती संकीर्ण पुरस्कार, रमेश कीर नाटक - एकांकिका पुरस्कार व सौ. लक्ष्मीबाई व न्यायमूर्ती राजाभाऊ गवांदे ललित गद्य पुरस्कारासाठी कोकणासह गोवा - कारवार - बेळगाव या प्रदेशातील लेखकांचाही विचार केला जाणार आहे.

पुरस्कारासाठी आपल्या पुस्तकाच्या दोन प्रती ३१ ऑक्टोबर २०२४ पूर्वी केंद्रीय कार्यवाह, कवी केशवसुत स्मारक संकुल, मालगुंड पो. मालगुंड ता. जि. रत्नागिरी - ४१५६१५ याठिकाणी पाठवावेत. अधिक माहितीसाठी ९७६४८८६३३० / ९०२१७८५८७४ यावर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.

या पुरस्कारासाठी लेखक, कवी हे कोकण मराठी साहित्य परिषदेच्या कार्यक्षेत्रातील (सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, ठाणे, मुंबई, नवी मुंबई) या परिसरातील आणि कोकण मराठी साहित्य परिषदेचे आजीव सभासद असणे आवश्यक असून, तशा प्रकारचे कोमसाप जिल्हाध्यक्ष अथवा शाखाध्यक्षांचे प्रमाणपत्र किंवा सभासद पावतीची छायांकित प्रत यासोबत जोडणे आवश्यक आहे. पुस्तकाचा वाङमय प्रकाराचा स्पष्ट निर्देश लेखकाने पुरस्कारासोबत करावयाचा आहे. वरील पुरस्कारासाठी पुस्तके ही १ एप्रिल २०२३ ते ३१ मार्च २०२४ या कालावधीत प्रसिद्ध झालेली असावीत.

तरी या पुरस्कारासाठी जास्तीत जास्त सभासदांनी पुस्तके पाठविण्याचे आवाहन कोमसापच्या केंद्रीय अध्यक्षा नमिता कीर, केंद्रीय कार्याध्यक्ष प्रा. डॉ. प्रदीप ढवळ यांनी केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:14 20-09-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow