रत्नागिरी : कर्मचारी, विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

Sep 20, 2024 - 14:36
 0
रत्नागिरी : कर्मचारी, विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ

रत्नागिरी : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधून २ ऑक्टोबर हा दिवस स्वच्छ भारत दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. त्या निमित्त 'स्वच्छता ही सेवा' मोहीम राबविण्यात येत असून, मंगळवारपासून सुरुवात झाली आहे. पुढील १५ दिवस म्हणजेच २ ऑक्टोबरपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेमध्ये विविध उपक्रम राबविण्यात येणार असून, बुधवारी कर्मचारी, विद्यार्थ्यांनी स्वच्छतेबाबत शपथ घेतली.

यावर्षी 'स्वच्छता ही सेवा, स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता', अशी थीम निश्चित केली आहे. त्या अनुषंगाने 'स्वच्छता ही सेवा' पंधरवडा कालावधीमध्ये विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत. यामध्ये मंगळवारी स्वच्छता ही सेवा अभियानाचा शुभारंभ गाव, तालुका व जिल्हा स्तरावर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. बुधवारी सफाई मित्र, सुरक्षा शिबिर या उपक्रमांद्वारे सफाई मित्रांसाठी एक खिडकी योजनेद्वारे सर्व योजनांच्या अनुषंगाने पात्र लाभार्थ्यांकरिता मोहीम राबवण्यात आली. गुरुवारी एक दिवस श्रमदानासाठी हा उपक्रम राबवण्यात आला. त्याचबरोबर सार्वजनिक वाहतूक केंद्रे, बाजारपेठ, ऐतिहासिक वस्तु, नदी घाट, समुद्रकिनारी स्वच्छता करण्यात आली.
 
शुक्रवारी खाऊगल्ली येथे स्वच्छतेची मोहीम त्याचबरोबर कचऱ्याची विल्हेवाट लावणे, २१ सप्टेंबर रोजी जिल्ह्याच्या संस्कृतीनुसार सांस्कृतिक कार्यक्रमांत पथनाट्ये व कलापथकांचे स्वच्छतेच्या अनुषंगाने जनजागृती कार्यक्रम आयोजित केला जाणार आहे. दि. २२ सप्टेंबर रोजी प्लास्टिक जनजागृतीसाठी एकल प्लास्टिक न वापरण्याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. २३ सप्टेंबर रोजी सर्व कुटुंबांना गृहभेटीद्वारे जनजागृती करून एक झाड आईच्या नावे उपक्रम राबवण्यात येणार आहे. २४ सप्टेंबर रोजी तालुकास्तरावर खासदार, आमदार, स्थानिक लोकप्रतिनिधी व सर्व विभागाचे शासकीय अधिकारी, कर्मचारी शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी यांच्या उपस्थितीत स्वच्छता ज्योत, स्वच्छता दौड, स्वच्छता सायकल स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

दि. २९ सप्टेंबर रोजी स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत निर्मिती करण्यात आलेल्या प्रकल्पांचे उद्घाटन करण्यात येणार आहे. दि. २ ऑक्टोबर रोजी ग्रामसभा घेऊन 'स्वच्छ माझे अंगण' स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट कुटुंबास प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे.

८४६ ग्रामपंचायतींचा सहभाग
हा उपक्रम २ ऑक्टोबरपर्यंत चालणार असून जिल्ह्यातील ८४६ ग्रामपंचायतींचा यामध्ये सहभाग असणार आहे. २ ऑक्टोबरला ग्रामसभेचेसुद्धा आयोजन करण्यात आले आहे. या अभियानात गाव स्तरावर गणेशोत्सव मंडळे, महाविद्यालय, शाळा, एनएसएस विद्यार्थी, एनसीसीचे विद्यार्थी, सामाजिक संस्था, महिला बचत गट, शासकीय-निमशासकीय कार्यालयांचा सहभाग घेऊन दैनंदिन उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:04 PM 20/Sep/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow