रत्नागिरीत डेंगी साथीचा फैलाव; ३०० च्या वर रुग्णसंख्या

Jun 11, 2024 - 10:50
Jun 11, 2024 - 10:58
 0
रत्नागिरीत डेंगी साथीचा फैलाव; ३०० च्या वर रुग्णसंख्या

रत्नागिरी : शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी डेंगी साथीचा फैलाव झाला आहे. अस्वच्छता आणि शहरी भागात पालिकांकडून डास फवारणीकडे झालेल्या दुर्लक्षामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. काही दिवसांपासून जिल्हा रुग्णालयात मोठ्या संख्येने डेंगांचे रुग्ण दाखल झाले आहेत. ५ महिन्यांत ही संख्या ३०० च्या वर गेली आहे. गेल्या पंधरा दिवसांमध्ये ही संख्या अधिक वाढली आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात असताना स्थानिक स्वराज्य संस्था मात्र सुस्तावलेल्या दिसत आहेत. स्वच्छ भारत योजनेमध्ये शहरी भागात स्वच्छतेला अधिक महत्त्व देत देशात रत्नागिरी पालिकने नाव कमावले; परंतु आज रत्नागिरी शहरात मोठ्या प्रमाणात डेगीचा फैलाव झाल्याचे चित्र आहे. कोकणनगर, मिरकरवाडा, शिवाजीनगर, राजिवडा, अभ्युदयनगर, मांडवी, खालचीआळी आदी भागातील रुग्ण जिल्हा रुग्णालय व खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत. नाचणे, पोमेंडी बुद्रुक, जयगडसह अन्य ग्रामीण भागात ही परिस्थिती आहे. जिल्ह्यात अन्य ठिकाणांहून डेंगीचे रूण आले आहेत. 

उघडी आणि अस्वच्छ गटारे याला कारणीभूत आहेत. आतापर्यंत केलेल्या तपासणीत १०० हून अधिक डेंगीचे रुग्ण आढळल्याची आकडेवारी आरोग्य विभागाकडे आहे; परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होणार आहे. अजूनही रुग्ण मोठ्या संख्येने खासगी रुग्णालयात आहेत. त्यांची नोंद नाही. स्थानिक स्वराज्य संस्थांचे स्वच्छतेकडे झालेले दुर्लक्ष, पाणीटंचाईमुळे साठवून ठेवण्यात येणाऱ्या पाण्यामुळे होणारी डासांची उत्पत्ती, फवारणीकडे झालेले दुर्लक्ष या गोष्टीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात
आले आहे. डास प्रतिबंध औषध महाग आहे. फॉगमशीनद्वारे जी फवारणी केली जाते तो निव्वळ धूर असतो; परंतु त्यामध्ये अपेक्षित डास प्रतिबंधक औषधाची मात्रा टाकणे आवश्यक आहे, त्याची टाळाटाळ होते. त्यामुळे फवारणी करूनही डास उत्पत्ती थांबत नाहीत.

जिल्हा शासकीय रुग्णालयासह, प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालयात गेल्यावर्षी २३९ डेंगीचे रुग्ण दाखल झाल्याचा आकडा आरोग्य विभागाचा आहे. यावेळी गेल्या पाच महिन्यांत १०० डेंगीचे रुग्ण सापडल्याचा आरोग्य खात्याकडे आकडा आहे. खासगी रुग्णालयातील आकड्याचा यामध्ये समावेश नाही. त्यामुळे ही संख्या ३०० च्या वर आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांनी वेळीच खबरदारी न घेतल्यास डेंगीच्या साथीचा फैलाव वाढण्याची शक्यता आहे. 

अभ्युदयनगरमध्ये फैलाव 
परिसरातील प्रत्येक वयोगटातील ग्रामस्थ डेंगीचे रुग्ण आहेत. पालिकेकडून डास प्रतिबंधक फवारणी झालेली नाही. जुनी गटारे पूर्ण कोसळू लागली असून, त्याची स्वच्छता झालेली नाही. नालेसफाई होत नसल्याने ठिकठिकाणी पाणी साचून रोगराई पसरण्याची भीती आहे, अशी प्रतिक्रिया अभ्युदयनगर येथील रहिवाशांनी दिली.

 जिल्ह्यात डेंगीचे रुग्ण सापडत आहेत. चाचणी झालेल्यांपैकी १०० जणांना डेंगीची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. स्वच्छता आणि फवारणी करण्याची गरज आहे. तसेच नागरिकांनी आठवडयातून एकदातरी कोरडा दिवस पाळावा डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा आरोग्य अधिकारी

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:19 AM 11/Jun/2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow