रत्नागिरी : सोमेश्वर शांतीपीठातर्फे वृक्षारोपणाचा संकल्प

Jun 12, 2024 - 14:41
 0
रत्नागिरी : सोमेश्वर शांतीपीठातर्फे वृक्षारोपणाचा संकल्प

रत्नागिरी : सोमेश्वर पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याचा संकल्प सोमेश्वर शांतीपीठातर्फे आयोजित कार्यक्रमात सर्वांनी केला. गावातील नैसर्गिक पर्यावरणाला धक्का न लावता वड, पिंपळ, हिरडा, बेहडा, फणस, रातांबे आदी पोषक अशी ५०० झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला.

सोमेश्वर शांतीपीठातर्फे सोमेश्वर येथे वृक्षारोपण आणि सोमेश्वर येथील दहावी, बारावी परीक्षांमधील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाला सोमेश्वरच्या सरपंच नाजिया मुकादम, उपसरपंच उत्तम नागवेकर, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष दत्तात्रय नागवेकर, एक्झॉटिक फूड इंडस्ट्रीचे प्रतिनिधी अनिरुद्ध गंधे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

सोमेश्वर शांतीपीठतर्फे विश्वमंगल गोशाळा आणि गो विज्ञान केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. या विस्तीर्ण परिसरात वृक्षारोपण केले.

शांतीपीठाचे अध्यक्ष राजेश आयरे यांनी प्रार्थना करून, उपस्थितांच्या हस्ते वृक्ष पूजनाने कार्यक्रमाला सुरवात झाली. मान्यवरांचा सत्कार शाल, श्रीफळ आणि रोप देऊन केला. प्रास्ताविक अशोक पाटील यांनी केले. त्यांनी सोमेश्वर गावाचा पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्याचा विश्वास व्यक्त केला.

नैसर्गिक पर्यावरणाला धक्का न लावता वड, पिंपळ, हिरडा, बेहडा, फणस, रातांबे आदी येथील वातावरणाला पोषक अशी ५०० झाडे लावण्याचा संकल्प व्यक्त केला. यासाठी सोमेश्वर गावातील लोकांचा सहभाग आवश्यक असल्याचे सांगितले. दहावी व बारावीतील गुणवंत शीना असिफ फणसोपकर, राहिला रफिक हुसीये, आदीब आश्रफ मुल्ला, मेहराज गडकरी, अब्दुल करीम जहीर मजगावकर, यश राजेश हरचिरकर, पार्थ प्रशांत हरचिरकर, प्रथमेश विश्वनाथ शिंदे, सिम्मी गडकरी, साईम गडकरी या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाला भारत शिक्षण मंडळाचे कार्यकारिणी सदस्य विनायक हातखंबकर, प्रकाश मुळ्ये यांनी शुभेच्छा दिल्या, अध्यक्षीय भाषणात शांतीपीठाचे संचालक रवींद इनामदार यांनी शांतीपीठाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. सचिव अनुजा पेठकर यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:10 12-06-2024

What's Your Reaction?

like

dislike

love

funny

angry

sad

wow