नागपूर: राज्यात निर्माण झालेल्या संभाव्य दुष्काळजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासन पूर्णपणे सतर्क झाले आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी प्रशासनाला व्यापक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्याचे महसूलमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी दुष्काळ नियोजनासोबतच राजकीय विषयांवरून काँग्रेसवर जोरदार टीकास्त्र सोडले.
दुष्काळावर सरकारचे नियंत्रण, प्रशासनाला ‘अलर्ट’
अल निनोच्या प्रभावामुळे राज्यात पावसाचे प्रमाण आणि परिस्थिती बदलली आहे. यावर मात करण्यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सर्व पालकमंत्र्यांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून परिस्थितीचा आढावा घेतला आहे.
“राज्यातील संभाव्य दुष्काळ परिस्थितीवर शासनाची भूमिका स्पष्ट असून, लवकरच यावर एक सविस्तर बैठक घेतली जाईल. यामध्ये विविध बाबींचा आढावा घेऊन दुष्काळ निवारण्यासाठी तातडीच्या उपाययोजना केल्या जातील,” असे आश्वासन बावनकुळे यांनी दिले.
काँग्रेसवर ‘विश्वासघाता’चा आरोप
महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून बावनकुळे यांनी काँग्रेसवर कडाडून टीका केली. “काँग्रेसने ‘लाडक्या बहिणीं’चा विश्वासघात केला आहे आणि जनता नक्कीच याचा बदला घेईल,” असे ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांना संसदेत मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध करून दिली आहे. मात्र, अनुसूचित जाती, ओबीसी आणि इतर वंचित घटकांतील महिलांना मुख्य प्रवाहात येण्यापासून रोखण्याचे काम काँग्रेसनेच केले आहे, असा गंभीर आरोपही त्यांनी केला.
यवतमाळ आणि परतवाडा प्रकरणावर महत्त्वाची भूमिका
राज्यातील कायदा व सुव्यवस्थेबाबत बोलताना बावनकुळे यांनी दोन महत्त्वाच्या मुद्द्यांवर भाष्य केले:
- यवतमाळ आदिवासी मुलींचे प्रकरण: यवतमाळमधील आदिवासी मुली बेपत्ता झाल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर असून, गृह खात्याकडे यासंदर्भातील सर्व माहिती उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः या प्रकरणात लक्ष घालून आहेत. आदिवासी विकास मंत्री अशोक ऊईके यांच्याकडूनही या प्रकरणावर देखरेख ठेवली जात असून, विदर्भातील हा प्रश्न असल्याने आपण स्वतःही यावर लक्ष ठेवून असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
- परतवाडा प्रकरणावर आवाहन: परतवाडा येथील संवेदनशील घटनेबाबत बोलताना बावनकुळे यांनी स्थानिक नेत्यांना संयम राखण्याचे आवाहन केले. “कोणतीही अधिकृत माहिती समोर येईपर्यंत विनाकारण आरोप-प्रत्यारोप करू नका. यामुळे समाजात धार्मिक तेढ निर्माण होऊन अमरावतीचे वातावरण बिघडू शकते,” असे सांगत सर्वांनी शांतता पाळण्याचे आवाहन केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:50 21-04-2026














