Tukaram Mundhe: तुकाराम मुंढेंची 25 वी बदली, आता अन्न आणि औषध प्रशासनात आयुक्त

मुंबई : आपल्या कामाच्या धडाडीमुळे सातत्याने चर्चेत असलेले आणि सातत्याने बदलीचा त्रास सहन करणाऱ्या तुकाराम मुंढे यांची (Tukaram Mundhe) पुन्हा एकदा बदली करण्यात आली आहे. लाचखोरी आणि इतर भ्रष्ट कामांमुळे चर्चेत असलेल्या अन्न आणि औषध प्रशासनात आता आयुक्त म्हणून तुकाराम मुंढेंची बदली करण्यात आली आहे.

तसा आदेश राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने जारी केला आहे.

दीडच महिन्यांपूर्वी तुकाराम मुंढे यांची दिव्यांग विभागातून राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन, पुनर्वसन व मदत कार्य विभागात बदली करण्यात आली होती. आता पुन्हा त्यांची अन्न आणि औषध प्रशासन खात्यात आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे.

FDA Corruption : भ्रष्ट कारभारामुळे विभाग चर्चेत

गेल्या काही दिवसांपासून राज्याचं अन्न आणि औषध प्रशासन खातं सातत्याने चर्चेत आहे. या विभागातल्या अधिकाऱ्यांवर सातत्याने भ्रष्टाचाराचे आरोप होताना दिसतात. राष्ट्रवादीचे नेते नरहरी झिरवाळ हे या खात्याचे मंत्री आहेत. काही दिवसांपूर्वी या विभागातील अधिकाऱ्याने मंत्रायलातच लाच घेतल्याचा प्रकार घडला होता. लाचलुचपत विभागाने मंत्रालयातच त्याला अटक करत कारवाई केली होती.

अन्न आणि औषध प्रशासन खात्यावर सत्ताधारी भाजपचे आमदारही नाराज असल्याचं दिसून येतंय. अनेकदा तक्रारी करूनही या विभागाकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असा तक्रारीचा सूरही त्यांनी गेल्या वेळच्या अधिवेशनामध्ये मांडला होता. त्याचवेळी या विभागातील अनेक अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभार मात्र सुरूच असल्याची दबक्या आवाजात चर्चा असते.

Tukaram Mundhe Transfer FDA Commissioner :तुकाराम मुंढे शिस्त लावणार का?

आपल्या शिस्तप्रिय आणि धडाकेबाज कामासाठी प्रसिद्ध असलेले तुकाराम मुंढे आता या खात्याचे नवे आयुक्त असणार आहेत. या आधी तुकाराम मुंढे यांनी दिव्यांग कल्याण विभागात आयुक्त म्हणून काम करताना मोठी कारवाई केली होती. बोगस दिव्यांग प्रमाणपत्र मिळवून सरकारी नोकरी मिळवलेल्या शेकडो कर्मचाऱ्यांवर त्यांनी निलंबनाची कारवाई केली होती.

तुकाराम मुंढेंची ही साफसफाईची कामं सुरू असतानाच त्यांची बदली करण्यात आली. 31 मार्च रोजी त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आणि दिव्यांग विभागातील बोगस अधिकाऱ्यांवरची कारवाईही थांबली. त्यानंतर मुंढे यांची राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन आणि पुनर्वसन मदत कार्य विभागात बदली करण्यात आली. या बदलीला दीड महिनेही उलटून जात नाहीत तोपर्यंत आता पुन्हा एकदा त्यांच्या बदलीचे आदेश जारी करण्यात आले आहेत.

IAS Tukaram Mundhe News : राजकीय नेत्यांच्या नापसंतीचे

प्रशासनात काम करताना नियमांवर बोट ठेवून काम करणारे तुकाराम मुंढे हे कोणत्याही सत्ताधाऱ्यांना पंसत नसल्याचं दिसून येतंय. राजकीय नेतृत्वाला, मंत्र्यांना आपल्या मनाप्रमाणे नियमबाह्य गोष्टी करण्यामध्ये तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी अडथळे ठरतात. त्यामुळे नियमानुसार सर्वसाधारणपणे तीन वर्षात बदली होणे अपेक्षित असताना तुकाराम मुंढे मात्र सरासरी एक वर्षही काम करू शकत नाहीत.

तुकाराम मुंढे हे 2005 बॅचचे अधिकारी असून गेल्या 21 वर्षांच्या कालावधीत त्यांची ही 25 वी बदली असल्याचं सांगण्यात येत आहे. प्रशासनात काम करताना हा एक वेगळ्या प्रकारे विक्रमच असल्याचं दिसून येतंय.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 20-05-2026