रत्नागिरी: शासनाने रेशन दुकानांवरून पुन्हा एकदा रॉकेल (केरोसिन) पुरवठा सुरू करण्याचा निर्णय घेतल्यामुळे सर्वसामान्य रेशन कार्डधारकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना हा निर्णय केवळ एक ‘मृगजळ’ ठरल्याचे चित्र समोर आले आहे. नव्या निकषांनुसार तालुक्यातील सर्व नागरिकांना रॉकेल मिळणार नसून ते फक्त ‘अंत्योदय’ अन्न योजनेच्या लाभार्थ्यांनाच प्रति रेशनकार्ड ३ लीटर दिले जाणार आहे.
याच मुद्द्यावरून आणि प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनावरून रत्नागिरी तहसील कार्यालयात पार पडलेल्या रेशन दुकानदारांच्या बैठकीत कमालीची खडाजंगी आणि जोरदार राडा झाला.
धक्कादायक: १३६ रेशन दुकानांसाठी केवळ ‘एकच’ टँकर!
बैठकीत रेशन दुकानदारांनी प्रशासकीय त्रुटींवरून तीव्र संताप व्यक्त केला. संपूर्ण रत्नागिरी तालुक्यासाठी प्रशासनाने रॉकेलचा फक्त एकच टँकर उपलब्ध करून दिला आहे. तालुक्यात एकूण १३६ रेशन दुकाने असताना केवळ एका टँकरवर संपूर्ण तालुक्याचे कसे भागणार, असा संतप्त सवाल दुकानदारांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनाच्या जाचक अटींमुळे दुकानदारांची कोंडी
रॉकेल वितरणासाठी प्रशासनाने तालुक्याला कारवांचीवाडी येथे टँकर उभा करण्याची जागा निश्चित केली आहे. येथून सर्व १३६ रेशन दुकानदारांनी स्वतः येऊन रॉकेल घेऊन जायचे आहे. त्यातही प्रशासनाने ‘केवळ रोख रक्कम (Cash) स्वीकारली जाईल, धनादेश (Cheque) चालणार नाही’ अशी जाचक अट घातल्याने दुकानदारांची मोठी कोंडी झाली आहे. आधीच वाहतुकीचा खर्च आणि त्यात रोखीने व्यवहार सक्तीचा केल्यामुळे रेशन दुकानदारांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे.
“शासन देत आहे, पण अधिकारी वर्गाकडून योग्य नियोजन नाही. तीन लीटरपैकी फक्त ९२ टक्के वाटायचे आहे. काही रेशन दुकानांवर अंत्योदयचे अवघे एक-दोन रेशनकार्ड आहेत. मग पाच-सहा लीटर रॉकेल आणण्यासाठी ठरवून दिलेल्या जागेवर जाण्यासाठी दुकानदाराला स्वतःचे पाचशे रुपये खर्च करावे लागणार आहेत. रॉकेल वाटायला दुकानदार तयार असून, प्रशासनाकडून योग्य साथ मिळत नाही.” — प्रशांत पाटील (तालुकाध्यक्ष, रास्त दर धान्य व केरोसिन संघटना, रत्नागिरी)
तांत्रिक अडचण: शासकीय मापेच झालीत नष्ट!
या संपूर्ण प्रक्रियेत आणखी एक मोठी तांत्रिक अडचण समोर आली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून रेशनवरील रॉकेल पुरवठा पूर्णपणे बंद होता. त्यामुळे बहुतांश रेशन दुकानदारांकडील रॉकेल मोजण्याची अधिकृत शासकीय मापे एकतर नष्ट झाली आहेत किंवा गंजून खराब झाली आहेत. यामुळे रॉकेल मोजावे कसे, असा मोठा पेच दुकानदारांसमोर निर्माण झाला आहे.
दुकानदारांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, जर रॉकेल स्वतःहून वाहून न्यायचे असेल तर दुकानांपर्यंत सुरक्षित वाहतूक करण्यासाठी आवश्यक ती अधिकृत परवानगी देण्यात यावी.
तहसीलदारांच्या उपस्थितीत बैठक
रत्नागिरी तहसील कार्यालयात पार पडलेल्या या महत्त्वपूर्ण बैठकीला तहसीलदार राजाराम म्हात्रे, तालुका पुरवठा अधिकारी आणि तालुक्यातील रास्त दर धान्य दुकानदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. दुकानदारांनी आपल्या सर्व मागण्या आणि हरकती प्रशासनासमोर मांडल्या असून यावर आता प्रशासन काय तोडगा काढणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या रेशनिंग अपडेटचे ठळक मुद्दे (Quick Highlights):
- नवा नियम: रेशनचे रॉकेल आता सर्वांना मिळणार नाही, केवळ ‘अंत्योदय’ रेशनकार्ड धारकांनाच पात्रता.
- कोट्याची मर्यादा: पात्र लाभार्थ्यांना प्रति रेशनकार्ड केवळ ३ लीटर रॉकेल मिळणार.
- नियोजनाचा अभाव: रत्नागिरी तालुक्यातील १३६ रेशन दुकानांसाठी केवळ १ टँकर उपलब्ध.
- दुकानदारांची मागणी: सुरक्षित वाहतुकीसाठी अधिकृत परवानगी द्यावी आणि रोख रकमेची सक्ती हटवावी.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:41 22-05-2026














