पाकिस्तानशी चर्चेचे पर्याय खुले ठेवायला हवेत, पूर्णपणे बंद करु नयेत : सरसंघचालक मोहन भागवत

नवी दिल्ली : पाकिस्तानशी चर्चेबाबत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका सरसंघचालक मोहन भागवत यांनी रविवारी स्पष्ट केली. सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या वक्तव्याचे समर्थन करत त्यांनी पाकिस्तानशी चर्चेचे पर्याय खुले ठेवण्याची गरज व्यक्त केली.

पाकिस्तानविषयी संघाचे केंद्र सरकारपेक्षा वेगळे धोरण नाही. केंद्राच्या धोरणाचेच पालन केले जाईल, असे भागवत यांनी नमूद केले.

युद्ध, भविष्यातील परिस्थितीवर भाष्य

भविष्यात एखाद्या युद्धात भारताने पाकिस्तानचा निर्णायक पराभव केल्यास तेथील लोकांना शांततेत जगण्यासाठी सक्षम करणे आवश्यक ठरेल. यासाठी या देशाशी चर्चेचे मार्ग कायम खुले ठेवले पाहिजेत, असे भागवत म्हणाले. ‘आपण हिटलरसारखे नाहीत. तो आपला स्वभाव किंवा मार्ग नाही’, असेही त्यांनी नमूद केले.

होसबळे यांच्या विधानावरून चर्चा

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत भारताने पाकिस्तानशी चर्चेचे दरवाजे पूर्णपणे बंद करू नयेत, असे मत व्यक्त केले होते. या विधानानंतर राजकीय आणि सामाजिक स्तरावर चर्चा झाली होती. त्यावर मोहन भागवत यांनी स्पष्टीकरण देत होसबळे यांचा संदर्भ पाकिस्तान या राष्ट्रापेक्षा तेथील जनतेशी संबंधित असल्याचे सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:31 15-06-2026