रत्नागिरीत : गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने चांगलाच जोर धरल्याने जिल्ह्यातील नद्या, ओढे आणि धबधबे पुन्हा एकदा तुडुंब भरून वाहू लागले आहेत. मुसळधार पावसामुळे डोंगरकपारींमधून कोसळणारे धबधबे आता पूर्ण क्षमतेने प्रवाहित होत असून, त्यांचे मनमोहक दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे.
जिल्ह्यातील संगमेश्वर, लांजा, राजापूर, चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली तालुक्यांतील अनेक लहान-मोठे धबधबे पावसामुळे नवसंजीवनी मिळाल्यासारखे दिसत आहेत. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची दुलई आणि कोसळणाऱ्या शुभ्र जलधारा यामुळे संपूर्ण परिसराचे सौंदर्य खुलून आले आहे. निसर्गप्रेमी, छायाचित्रकार तसेच युवक-युवती मोठ्या संख्येने या ठिकाणी भेट देत आहेत.
जिल्ह्यातील मार्लेश्वर येथील धबधबा, निवळी धबधबा, सवातसडा धबधबा, परशुराम घाट परिसरातील धबधबे, ओणी घाट परिसरातील धबधबे, प्रचितगड येथील धबधबे तसेच पूर्णगड आणि दापोली तालुक्यातील आसूद येथील धबधबे आता चांगलेच प्रवाहित झाले आहेत.
पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. भात लागवडीच्या कामांना वेग आला असून, जलस्रोतांमध्ये पाणीसाठा वाढू लागल्याने आगामी हंगामासाठीही आशादायक चित्र निर्माण झाले आहे. अनेक विहिरी, तलाव आणि बंधारे पाण्याने भरू लागल्याने ग्रामीण भागातील नागरिकांनाही दिलासा मिळाला आहे.
दरम्यान, सतत पडणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचणे, झाडांच्या फांद्या तुटणे तसेच लहान-मोठ्या दरडी कोसळण्याच्या घटनाही घडत आहेत. त्यामुळे प्रशासनाने नागरिकांना आणि पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः धबधब्यांच्या परिसरात पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो. त्यामुळे पाण्यात उतरू नये, धोकादायक ठिकाणी सेल्फी काढण्याचा मोह टाळावा आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धबधब्यांचे सौंदर्य आणखी खुलण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
पावसामुळे रत्नागिरीचा निसर्ग पुन्हा एकदा बहरला असून, कोकणातील पावसाळी पर्यटनालाही चालना मिळत आहे. मात्र निसर्गसौंदर्याचा आनंद घेताना सुरक्षिततेचे सर्व नियम पाळणे तितकेच आवश्यक असल्याचे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:56 04-07-2026














