Guhagar: मोडकाघर पुलावर रिक्षा पलटी होऊन अपघात; दोन महिला जखमी, एक वर्षीय बालकाचा मृत्यू; मृत्यूच्या कारणाबाबत गूढ

ताप आलेल्या बालकाला रुग्णालयात नेताना अपघात; अपघातापूर्वीच मृत्यू झाला होता की अपघातात? पोलीस तपासाकडे लक्ष

गुहागर: Guhagar News Update | गुहागर-विजापूर राष्ट्रीय महामार्गावरून एक अत्यंत दुर्दैवी आणि संशयास्पद घटना समोर आली आहे. महामार्गावरील मोडकाघर पुलावर सोमवारी रात्री झालेल्या एका रिक्षा अपघातात दोन महिला गंभीर जखमी झाल्या असून, एका एक वर्षीय निष्पाप बालकाचा मृत्यू झाला आहे. मात्र, या बालकाचा मृत्यू नेमका या अपघातात झाला की अपघातापूर्वीच त्याचा जीव गेला होता, याबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता आलेली नाही. पोलीस तपासानंतरच या मृत्यूमागील नेमके सत्य समोर येणार आहे.

ताप आल्याने उपचारासाठी शृंगारतळी येथे गेले होते कुटुंब

मिळालेल्या माहितीनुसार, धोपावे कुळेवाडी येथील रहिवासी असलेल्या स्वयंम सुरेंद्र कुळे (वय १ वर्ष) या चिमुरड्याला तीव्र ताप आला होता. त्यामुळे सोमवारी सायंकाळी त्याला उपचारासाठी शृंगारतळी येथील एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आले होते. या बालकासोबत त्याची आई स्वरा सुरेंद्र कुळे यांच्यासह सुप्रिया सुरेश कुळे, रमिला रमेश कुळे आणि कविता किशोर माने अशा चार महिला होत्या. हे सर्वजण गावातीलच रिक्षाचालक अनमोल शिरगावकर यांच्या रिक्षामधून शृंगारतळी येथे गेले होते.

रुग्णालयात डॉक्टरांचा संशय; गुहागरला जात असताना अपघात

शृंगारतळी येथील खाजगी रुग्णालयात तपासणी दरम्यान डॉक्टरांनी एक धक्कादायक बाब नातेवाईकांच्या निदर्शनास आणून दिली. बालक कोणतीही हालचाल करत नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले आणि अधिक तपासणी व पुढील उपचारासाठी त्याला तातडीने गुहागर ग्रामीण रुग्णालयात (Guhagar Rural Hospital) घेऊन जाण्याचा सल्ला दिला.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सर्वजण त्याच रिक्षातून तातडीने गुहागरच्या दिशेने निघाले. दरम्यान, रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास मोडकाघर पुलावर आले असता, अंधारामुळे किंवा अन्य कारणामुळे रिक्षाचालकाला गतिरोधकाचा (Speed Breaker) अंदाज आला नाही. त्यामुळे चालकाचे नियंत्रण सुटून रिक्षा रस्त्याच्या उजव्या बाजूला पलटी झाली.

दोन महिला जखमी; मृत्यूचे नेमके कारण काय?

या भीषण अपघातात रिक्षामधील प्रवाशांपैकी रमिला रमेश कुळे आणि कविता किशोर माने या दोन महिला जखमी झाल्या आहेत. तर दुसरीकडे, एक वर्षीय स्वयंम कुळे या बालकाला मृत घोषित करण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असली, तरी बालकाच्या मृत्यूच्या वेळेबाबत आता संभ्रम निर्माण झाला आहे. खाजगी रुग्णालयातच बालकाची हालचाल बंद झाली होती की मोडकाघर पुलावरील अपघाताच्या धक्क्यामुळे त्याचा मृत्यू झाला, याचा शोध आता पोलिसांना घ्यावा लागणार आहे. गुहागर पोलीस या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 15-07-2026