रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग (एनएच-६६) वर लांजा येथील शासकीय विश्रामगृहापासून सुमारे १०० मीटर अंतरावर आज सकाळी सुमारे ७ वाजण्याच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात क्रेटा कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असून कारचा चालक गंभीर जखमी झाला आहे.
प्राथमिक माहितीनुसार, गोव्याहून मुंबईच्या दिशेने जाणारी क्रेटा कार (क्र. MH 01 CP 8021) ही रस्त्याच्या कडेला बंद पडलेल्या आणि उभ्या असलेल्या डंपरला (क्र. MH 05 EL 3877) पाठीमागून जोरदार धडकली. धडक इतकी भीषण होती की कारचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला.
अपघाताची माहिती सकाळी ७.१५ वाजता लांजा पोलीस ठाण्याकडून मिळाल्यानंतर पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमी चालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून ते सर्व मुंबई येथील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती आहे.
या प्रकरणी संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असून अपघाताचे नेमके कारण आणि इतर बाबींचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:38 15-07-2026














