Lonavala Varsha Marathon: लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीचा डंका; मानसी मराठे, अजित किंजळे आणि अनंत तानकर यांना द्वितीय क्रमांक

३५ किमी आणि १० किमी अंतराच्या शर्यतीत रत्नागिरीच्या धावपटूंचे दैदिप्यमान यश; जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा

रत्नागिरी: ‘Lonavala Varsha Marathon’ (लोणावळा वर्षा मॅरेथॉन) या राष्ट्रीय पातळीवरील प्रतिष्ठेच्या स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्यातील धावपटूंनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर जिल्ह्याचे नाव सुवर्ण अक्षरांनी कोरले आहे. नुकत्याच पार पडलेल्या या आव्हानात्मक पावसाळी मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या मानसी मराठे, वाटद खंडाळा येथील अजित किंजळे आणि गुहागरचे अनंत तानकर यांनी आपापल्या वयोगटात द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे.

या क्रीडा उत्सवादरम्यान रत्नागिरीतील धावपटू आणि सायकलस्वारांनी विविध ठिकाणी उल्लेखनीय सहभाग नोंदवला. लोणावळा वर्षा मॅरेथॉनमध्ये जिल्ह्यातील ३० जणांनी, तर कुडाळ मान्सून मॅरेथॉनमध्ये १० जणांनी धाव घेतली. याशिवाय ५० हून अधिक क्रीडाप्रेमींनी सायकलवारीमध्ये सहभाग घेऊन जिल्ह्यातील ‘फिटनेस’ चळवळीला एका नव्या उंचीवर नेले आहे.

लोणावळा वर्षा मॅरेथॉनमधील अत्यंत कठीण मानल्या जाणाऱ्या ३५ किलोमीटरच्या अंतरामध्ये वाटद खंडाळा (किंजळेवाडी) येथील धावपटू अजित अनंत किंजळे याने राज्याचे लक्ष वेधून घेतले. पुरुषांच्या ३१ ते ४० वयोगटात खेळताना अजितने अवघ्या ४ तास २२ मिनिटांत हे अंतर पूर्ण करून द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले. बी.कॉम पदवीधारक असलेला आणि सध्या बांधकाम व आंबा व्यवसायात कार्यरत असलेला अजित हा २०२४ च्या ‘कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉन’पासून नियमित सरावाकडे वळला असून, तेव्हापासून त्याने विविध स्पर्धांमध्ये सातत्याने यश मिळवले आहे.

महिलांच्या गटात रत्नागिरीतील पोमेंडी बुद्रुक येथील महिला धावपटू सौ. मानसी मराठे यांनी ३५ किलोमीटरचे खडतर अंतर ४ तास ३१ मिनिटांत पार केले. त्यांनी महिलांच्या ४१ ते ५० या वयोगटामध्ये द्वितीय क्रमांक पटकावून रत्नागिरीच्या क्रीडा क्षेत्रात मानाचा तुरा खोवला. मानसी मराठे यांनी यापूर्वीही कोकण कोस्टल हाफ मॅरेथॉनमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत यश संपादन केले होते.

गुहागरचे प्रसिद्ध धावपटू अनंत तानकर यांनीही आपल्या अनुभवाच्या जोरावर या स्पर्धेत यश मिळवले. त्यांनी ४१ ते ५० या वयोगटात १० किलोमीटरचे अंतर अवघ्या ४५ मिनिटांत पार करून द्वितीय क्रमांक मिळवला. तानकर यांनी यापूर्वी कोकण कोस्टल मॅरेथॉनसह राज्यातील इतर अनेक मॅरेथॉन आणि सायकलिंग स्पर्धांमध्ये अनेकदा पदके आणि सुयश मिळवले असून, त्यांचा हा अनुभव लोणावळ्यातही कामी आला. या सर्व विजेत्यांवर रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:33 16-07-2026