रत्नागिरीत कोकण कला अकादमी आणि आर्ट कॉलेज सुरू करा; सचिन वहाळकर यांची सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे मागणी

कोकणातील कलाकारांना स्थानिक पातळीवर व्यासपीठ आणि दर्जेदार कला शिक्षण मिळण्यासाठी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर आक्रमक; मंत्री आशिष शेलार यांचे सकारात्मक आश्वासन

रत्नागिरीत कोकण कला अकादमी तसेच आर्ट अँड डिझाईन महाविद्यालय सुरू करण्यात यावे, अशी आग्रही मागणी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष सचिन वहाळकर यांनी राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली आहे. रत्नागिरी जिल्हा दौऱ्यानिमित्त आलेले मंत्री आशिष शेलार यांनी भाजप जिल्हा कार्यालयाला भेट दिली असता, वहाळकर यांनी त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यांसंबंधीचे सविस्तर निवेदन सादर केले.

मुंबईतील प्रभादेवी येथील प्रसिद्ध पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी तसेच गोवा कला अकादमीच्या धर्तीवर रत्नागिरी येथे संपूर्ण कोकण विभागासाठी स्वतंत्र कला अकादमी स्थापन करावी, ही या निवेदनाची मुख्य मागणी होती.

कोकणातील कलाकारांनी रंगभूमी, संगीत, साहित्य, चित्रकला, लोककला आणि भारतीय नृत्यशैली अशा विविध क्षेत्रांत राज्य तसेच राष्ट्रीय स्तरावर आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. मात्र, अत्याधुनिक सुविधा आणि योग्य व्यासपीठाच्या अभावामुळे स्थानिक कलाकारांना मुंबई, पुण्यासारख्या महानगरांकडे धाव घ्यावी लागते. रत्नागिरीत ही अकादमी स्थापन झाल्यास कलाकारांना प्रशिक्षण, संशोधन, कार्यशाळा, सादरीकरण आणि प्रदर्शनासाठी स्थानिक पातळीवरच आधुनिक सोयी उपलब्ध होतील, असे वहाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.

आर्ट अँड डिझाईन महाविद्यालयामुळे स्थानिक रोजगाराला मिळणार चालना

यासोबतच नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई येथील शासकीय आर्ट अँड डिझाईन महाविद्यालयांच्या धर्तीवर रत्नागिरी येथेही स्वतंत्र आर्ट अँड डिझाईन महाविद्यालय सुरू करावे, अशी मागणी त्यांनी केली. हे महाविद्यालय मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्रामार्फत किंवा स्वतंत्र स्वरूपात सुरू झाल्यास कोकणातील विद्यार्थ्यांना उच्च दर्जाचे कला शिक्षण मिळेल आणि यातून रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या सर्व मागण्यांची गांभीर्याने दखल घेत सांस्कृतिक कार्य मंत्री नामदार आशिष शेलार यांनी या विषयावर सकारात्मक विचार करून शासनस्तरावर आवश्यक ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे सचिन वहाळकर यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:14 20-07-2026