आठवडा बाजार ते पटवर्धन हायस्कूल मार्गावर किरकोळ कारणावरून वाद; मारहाणीत रिक्षाचालकाच्या ओठाला पडले टाके, डोळ्याला दुखापत
रत्नागिरीत रिक्षा मागे घेण्याच्या कारणावरून चालकास अमानुष मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार ते पटवर्धन हायस्कूल दरम्यान असलेल्या शिवा ऑप्टिकल जवळ १५ जुलै रोजी सकाळी ११.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी मनिष बळीराम कुवळेकर (रा. चवंडेवठार, रत्नागिरी) याच्याविरोधात गंभीर दुखापत पोहोचवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी मिलिंद मुरलीधर भाटकर (वय ५१, रा. पेट किल्ला कुरणवाडी, रत्नागिरी) हे आपल्या नातवाला रियांश सर्वे (वय ८) याला स्वतःच्या रिक्षाने (क्रमांक MH 08 AV 7453) पटवर्धन हायस्कूलमध्ये सोडण्यासाठी जात होते. प्रवास सुरू असताना पटवर्धन हायस्कूलच्या बाजूने समोरून एक चारचाकी गाडी आल्यामुळे सुरक्षिततेचा उपाय म्हणून मिलिंद भाटकर यांनी आपली रिक्षा थोडी मागे घेतली.
रिक्षा मागे घेत असताना मागे स्कूटरवर उभा असलेला आरोपी मनिष कुवळेकर याला या गोष्टीचा राग आला. त्याने फिर्यादी भाटकर यांना रिक्षा मागे घेतल्याचा जाब विचारत अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. वाद वाढल्याने आरोपीने थेट रिक्षाचालकावर हल्ला चढवून हाताच्या ठोशांनी त्यांच्या तोंडावर व डाव्या डोळ्यावर जबर मारहाण केली.
गंभीर दुखापत व पोलीस तपास
या अचानक झालेल्या प्राणघातक मारहाणीत मिलिंद भाटकर यांच्या ओठाला गंभीर दुखापत झाली असून त्यांना रुग्णालयात टाके घालावे लागले आहेत. याशिवाय डाव्या डोळ्याला गंभीर इजा झाल्याने त्यांची दृष्टी धुरकट होऊन त्यांना कमी दिसू लागले आहे.
या घटनेप्रकरणी १८ जुलै रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम ११७(२), ११५(२), ३५२ आणि भारतीय दंड विधान कलम ३२५, ३२३, ५०४ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. रत्नागिरी शहर पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 20-07-2026















