जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओव्हरफ्लो झालेले शीळ धरण अजूनही तुडुंब; धरणातील हजारो अंतःप्रवाहित झऱ्यांमुळे पाणीसाठा कायम
रत्नागिरी पावसाने दडी मारली तरी शीळ धरण ओसंडूनच वाहत असल्याने रत्नागिरी शहरवासीयांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. गेल्या दोन आठवड्यांपासून पावसाने पूर्णपणे ओढ दिली असली, तरी शहराला पाणीपुरवठा करणारे मुख्य आधारस्थान असलेले शीळ धरण अजूनही पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो होत आहे. जुलैच्या पहिल्याच आठवड्यात हे धरण पूर्ण भरले होते. त्यानंतर पावसाचे प्रमाण अत्यंत नगण्य राहिले असले, तरी धरणातील हजारो नैसर्गिक झरे पूर्ण क्षमतेने अंतःप्रवाहित राहिल्यामुळे धरणातील पाणी पातळी कायम आहे.
शीळ धरणाची एकूण पाणी साठवण क्षमता ३.३३६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे. या धरणातून रत्नागिरी शहरासाठी दररोज सुमारे १८ ते २० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. २८ जून रोजी हे धरण ७० टक्के भरले होते आणि धरणात २.३५८ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा जमा झाला होता. या साठ्यामुळे आधी बंद असलेला सोमवारचा नियमित पाणीपुरवठाही प्रशासनाकडून पूर्ववत सुरू करण्यात आला होता.
सुरवातीला झालेल्या मुसळधार पावसामुळे पाणी जमिनीत मोठ्या प्रमाणात मुरले आणि धरणातील अंतर्गंत हजारो झरे पुन्हा प्रवाहित झाले. त्यामुळे जुलैच्या पहिल्या आठवड्यातच धरण ओव्हरफ्लो झाले.
दोन आठवड्यांच्या विश्रांतीनंतरही धरणातील पाणीसाठा कायम
गेल्या १५ दिवसांत पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून केवळ तुरळक सरी कोसळल्या आहेत. दररोज शहराला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जात असला, तरी धरणातील पाण्याचा उपसा जाणवत नाही.
जमिनीत मुरलेल्या पाण्यामुळे धरणातील जिवंत झरे जोमाने वाहत आहेत, ज्यामुळे शीळ धरणातील पाणी पातळी स्थिर राहून धरण अजूनही ओसंडून वाहत आहे. यामुळे चालू पावसाळ्यात शहरावर पाण्याचे कोणतेही संकट येणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:15 20-07-2026














