दैनंदिन कामकाज आणि शिक्षण ठप्प; माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी (Ratnagiri Mobile Network Issue) तालुक्यातील उक्षी आणि बनाचीवाडी गावामध्ये गेल्या दोन वर्षांपासून मोबाईल नेटवर्क पूर्णपणे गायब झाल्यामुळे संतप्त ग्रामस्थांनी थेट मोबाईल कंपनीच्या कार्यालयावर धडक देऊन जाब विचारला आहे. वारंवार तक्रारी करूनही कंपनी प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
टेकड्यांवर जाऊन फोन लावण्याची पाळी; रिचार्जचे पैसे वाया
गावात नेटवर्क नसल्याने नागरिकांचे दैनंदिन कामकाज, विद्यार्थ्यांचे ऑनलाईन शिक्षण आणि ऑनलाईन शासकीय कामे पूर्णपणे ठप्प झाली आहेत. सुरुवातीच्या काळात या कंपनीचे नेटवर्क उत्तम मिळत असल्याने अनेक ग्रामस्थांनी २ ते ३ सिमकार्ड खरेदी केले होते. मात्र, आता दरमहा ३०० ते ४०० रुपयांचे रिचार्ज मारूनही फोन लावण्यासाठी किंवा इंटरनेट वापरण्यासाठी नागरिकांना उंच टेकड्यांवर जावे लागत आहे.
माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्याकडून कंपनीच्या टाळाटाळीचा पर्दाफाश
माजी उपसरपंच हरिश्चंद्र बंडबे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांनी या समस्येबाबत सतत पाठपुरावा केला होता. महिन्याभरापूर्वी कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गावात येऊन केलेल्या सर्व्हेमध्ये नेटवर्क नसल्याची वस्तुस्थिती स्पष्ट झाली होती. तरीही, समस्येवर तोडगा न काढता आता कंपनी प्रशासनाकडून ग्रामपंचायतीच्या पत्राची कारणे पुढे करून टाळाटाळ केली जात असल्याचे हरिश्चंद्र बंडबे यांनी सांगितले.
टावर किंवा बूस्टर बसवण्याची मागणी; तीव्र आंदोलनाचा इशारा
सिमकार्ड विकताना कोणतीही मंजुरी न मागणारी कंपनी सेवा देण्याच्या वेळी मात्र अडवणूक करत असल्याचा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. तातडीने नेटवर्क टॉवर किंवा बूस्टर बसवून सेवा पूर्ववत करण्याची मागणी उक्षी व बनाचीवाडीवासीयांनी केली असून, प्रशासनाने त्वरित तोडगा न काढल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:27 26-08-2026














