Kendra Pramukh Grant News: केंद्र प्रमुखांचे ४ टक्के अनुदान वेळेत द्या; महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ, रत्नागिरीचे शिक्षण सभापतींना निवेदन

प्रलंबित मागण्यांसाठी रत्नागिरीत शिष्टमंडळाचे जिल्हा परिषद शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर व शिक्षणाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरीत नियमानुसार देय असलेले ४ टक्के अनुदान सन २०२५-२६ चे अद्यापही न मिळाल्याने शैक्षणिक कामांवर विपरीत परिणाम होत आहे. केंद्रप्रमुखांच्या या प्रलंबित समस्या सोडवून तात्काळ न्याय द्यावा, या मागणीसाठी ‘महाराष्ट्र राज्य केंद्रप्रमुख संघ’, रत्नागिरी शाखेच्या वतीने मंगळवारी जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती नंदकुमार मुरकर आणि प्राथमिक शिक्षणाधिकारी मनीषा कदम यांना निवेदन सादर करण्यात आले.

पदोन्नतीनंतरची वेतनवाढ आणि आदर्श पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची मागणी

केंद्रप्रमुख संघाने सादर केलेल्या निवेदनात विविध आर्थिक व सेवाविषयक मागण्यांचा समावेश आहे. २६ सप्टेंबर २०२३ च्या शासन निर्णयानुसार पदोन्नतीनंतरची वेतनवाढ काही तालुक्यांमध्ये अद्याप दिलेली नाही, ती त्वरित मंजूर करण्यात यावी अशी आग्रही मागणी करण्यात आली. तसेच, मागील दोन वर्षांपासून बंद असलेला ‘आदर्श केंद्रप्रमुख पुरस्कार’ सन २०२६-२७ पासून पुन्हा नियमित सुरू करावा, अशी मागणीही संघाकडून करण्यात आली.

पदोन्नतीबाबतचा संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हास्तरावरून मार्गदर्शक सूचनांची गरज

Happy journey english

सन २०२६ मधील नवीन पत्रव्यवहारामुळे पदोन्नतीबाबत निर्माण झालेला संभ्रम दूर करण्यासाठी जिल्हास्तरावरून सर्व तालुक्यांना स्पष्ट मार्गदर्शक सूचना देण्यात याव्यात, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. या सर्व मागण्या थेट शैक्षणिक गुणवत्ता व कार्यक्षमतेशी संबंधित असून प्रशासनाने यावर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

संघटनेकडून तीव्र नाराजी व्यक्त; शिष्टमंडळाची उपस्थिती

यापूर्वी अनेक वेळा निवेदने देऊनही समस्या प्रलंबित राहिल्याने केंद्रप्रमुख संघाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जिल्हाध्यक्ष सुनील जाधव व राज्य नेते बाबाजी जयराम शिर्के यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने हे निवेदन सादर केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:47 26-08-2026