MSRTC Ratnagiri: रत्नागिरी एसटी विभाग ९.३२ कोटींनी तोट्यात; राज्यात तिसऱ्या क्रमांकावर, महामंडळाला जुलै महिन्यात मोठा आर्थिक फटका

अपुऱ्या बसेस, कर्मचाऱ्यांची टंचाई आणि दुर्दशेमुळे प्रवासी खासगी वाहतुकीकडे; सुधारणेसाठी तातडीने उपायांची गरज

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाला (एसटी) जुलै महिन्यात मोठा आर्थिक फटका बसला असून, महामंडळाला कोट्यवधी रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. यामध्ये कोकणातील रत्नागिरी विभाग ९.३२ कोटी रुपयांच्या तोट्यासह राज्यात तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला आहे. या यादीत नाशिक विभाग पहिल्या क्रमांकावर असून कोल्हापूर, सातारा आणि सांगली हे विभागही मोठ्या तोट्यात आहेत.

रत्नागिरी विभागात मोठ्या प्रमाणात एसटी बसेस भंगारात गेल्या आहेत. काही नवीन बसेस दाखल झाल्या असल्या, तरी मागणीच्या तुलनेत गाड्यांची संख्या अद्याप अपुरीच आहे. याशिवाय चालक, वाहक (कंडक्टर) आणि यांत्रिक कर्मचाऱ्यांची पदे मोठ्या प्रमाणावर रिक्त असल्याने त्याचा थेट परिणाम दैनंदिन सेवेवर होत आहे. बसेस वेळेवर न सुटणे आणि गाड्यांची झालेली दुर्दशा यामुळे त्रस्त झालेले प्रवासी आता वडाप, मिनीबस व इतर खासगी चारचाकी वाहनांचा आधार घेत आहेत.

रत्नागिरी विभागाला पुन्हा नफ्यात आणण्यासाठी प्रशासनाला मोठ्या प्रमाणावर मेहनत घ्यावी लागणार आहे. यासाठी शहरी बससेवा नगरपरिषदेकडे वर्ग करून एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बससेवेवर अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे मानले जात आहे. तसेच नवीन बसेसची उपलब्धता, रिक्त पदांची तातडीने भरती, ई-बसेसचा समावेश आणि गर्दीच्या मार्गांवर जादा बसेस सोडणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या तक्रारींचे वेळेत निवारण करून गाड्यांचे अचूक नियोजन केल्यास टप्प्याटप्प्याने हा तोटा कमी होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:01 26-08-2026

Tata sierra