सर्वसाधारण आणि अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांनी लाभ घेण्याचे आवाहन
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजनेंतर्गत २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठी विविध घटकांचा लाभ घेण्यासाठी सर्वसाधारण प्रवर्गासह अनुसूचित जाती प्रवर्गातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत, असे आवाहन रत्नागिरीचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील फलोत्पादनाला आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाला मोठी गती देण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना नवीन रोपवाटिका स्थापन करणे, फळबाग क्षेत्रविस्तार तसेच स्ट्रॉबेरी, ड्रॅगनफ्रूट, पॅशन फ्रूट, किवी, अव्हेकॅडो, अननस आणि पपई यांसारख्या आधुनिक व उच्च मूल्य असलेल्या फळपिकांची लागवड करण्यासाठी आर्थिक लाभ दिला जाणार आहे. याशिवाय विशेष शेती व उत्पादन, पाणी व्यवस्थापन व संरक्षित शेतीअंतर्गत सामूहिक शेततळे आणि हरितगृह (ग्रीनहाऊस) उभारणीसाठीही शासनाकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.
शेतीमध्ये पाण्याचे बाष्पीभवन रोखण्यासाठी आणि पिकांच्या सुरक्षेसाठी प्लास्टिक मल्चिंग, फळांच्या घडांचे कव्हर व तण नियंत्रक आच्छादन यांसारख्या आधुनिक घटकांचाही या अभियानात समावेश करण्यात आला आहे. इच्छुक शेतकऱ्यांनी जवळच्या ‘आपले सरकार सेवा केंद्रा’मध्ये जाऊन किंवा थेट महाडीबीटीच्या अधिकृत पोर्टलवर ऑनलाईन पद्धतीने आपले अर्ज नोंदवावेत, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सदाफुले यांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:18 26-08-2026














