पाहा तालुकानिहाय सविस्तर आकडेवारी
रत्नागिरी जिल्ह्यात एकूण २ हजार ७१२ शाळा असून त्यापैकी तब्बल ४०० शाळांना स्वतंत्र स्वयंपाकघर (किचन शेड) उपलब्ध नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. सध्या जिल्ह्यात केवळ २ हजार ३१२ शाळांमध्येच किचन शेडची सुविधा उपलब्ध आहे. स्वयंपाकघर नसल्याने अनेक ठिकाणी उघड्यावर किंवा जुन्या पडक्या खोल्यांमध्येच अन्न शिजवले जात असून, यामुळे शालेय पोषण आहारातील स्वच्छता व गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यापासून शालेय विद्यार्थ्यांना दिला जाणारा पोषण आहार गुणवत्तापूर्ण आणि स्वच्छ वातावरणात शिजवला जावा, यासाठी तपासणी मोहीम तीव्र करण्यात आली आहे. पोषण आहारात पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी १२ ग्रॅम प्रथिने मिळण्यासाठी १०० ग्रॅम तांदूळ व इतर पदार्थ, तर सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना प्रत्येकी २० ग्रॅम प्रथिने मिळण्यासाठी १५० ग्रॅम तांदूळ आणि पूरक धान्य पुरवले जाते. मात्र, अनेक शाळांमध्ये धान्य सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही आणि स्वयंपाकघर नसल्याने स्वच्छतेचा फज्जा उडत असल्याचे चित्र आहे.
तालुकानिहाय आकडेवारीचा विचार करता, खेड तालुक्यात सर्वाधिक १०० शाळांना आणि लांजा तालुक्यात ७० शाळांना किचन शेड नाही. नवीन स्वयंपाकघरांसाठी प्रशासनाकडून शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. अन्न व औषध विभागाने शिक्षण विभागाच्या साथीने शाळांमधील आहाराच्या गुणवत्तेवर व स्वच्छतेवर नियमित लक्ष ठेवावे, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
तालुकानिहाय शाळा व किचन शेड नसलेली संख्या
| तालुका | एकूण शाळा | किचन नसलेली संख्या |
| मंडणगड | १५८ | २५ |
| दापोली | २९८ | ०७ |
| खेड | ३५० | १०० |
| चिपळूण | ३७० | ४५ |
| गुहागर | २०९ | ५९ |
| संगमेश्वर | ३५४ | २३ |
| रत्नागिरी | ३४१ | ३० |
| लांजा | २२५ | ७० |
| राजापूर | ३६६ | १६ |
| न.प. (नगरपरिषद) | ३३ | २५ |
| एकूण | २७१२ | ४०० |
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:38 26-08-2026














