कारचे मोठे नुकसान, खेड पोलिसांत गुन्हा नोंदवून तपास सुरू
कशेडी ओझरवाडीत टोयोटा कारचा भीषण अपघात झाल्याची घटना १७ जुलै रोजी सकाळी घडली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी येथील ओझरवाडी परिसरात अतिपावसामध्ये गाडीवरील ताबा सुटल्याने कार थेट रस्त्याच्या मध्य दुभाजकाला धडकून स्ट्रीट लाईटच्या पोलवर जाऊन आदळली. या अपघातप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राप्त माहितीनुसार, आरोपी केशव एकनाथ खवणेकर (वय ५०, रा. वास्को, गोवा) हा १७ जुलै रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास आपल्या टोयोटा हायरायडर कारने (क्रमांक GA 06 K 0618) मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करत होता. कशेडी ओझरवाडी परिसरात पोहोचले असता, मुसळधार पावसामुळे चालकाचे गाडीवरील नियंत्रण अचानक सुटले. परिणामी, भरधाव कार आधी रस्त्यावरील मध्य दुभाजकाला (डिव्हायडर) धडकली आणि त्यानंतर रस्त्याशेजारी असलेल्या स्ट्रीट लाईटच्या पोलवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात टोयोटा कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, अपघातामध्ये चालक आणि साक्षीदार जखमी झाले आहेत.
खेड पोलिसांत गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या अपघाताप्रकरणी खेड पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार अजित संतोष कदम यांनी फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या फिर्यादीवरून खेड पोलिसांनी १८ जुलै रोजी सायंकाळी ६.५३ वाजता आरोपी चालक केशव खवणेकर याच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ चे कलम २८१, १२५(अ) आणि मोटार वाहन कायद्याचे कलम १८४ नुसार गुन्हा नोंदवला आहे. अतिपावसात भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणाने वाहन चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी खेड पोलीस पुढील अधिक तपास करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 20-07-2026















