Ratnagiri : विषारी औषध प्राशन केल्याने दापोलीतील तरुणाचा मृत्यू

रत्नागिरी शहर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान एका ३० वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. राहत्या घरी गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केल्यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली होती. मिलिंद सुरेश भुवड (वय ३०, रा. साखळोली गणेशवाडी, ता. दापोली) असे मृत पावलेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

प्राप्त माहितीनुसार, मिलिंद भुवड याने ११ जुलै रोजी सायंकाळी ७.३० वाजण्याच्या सुमारास दापोली येथील आपल्या राहत्या घरी अज्ञात कारणातून गवत मारण्याचे विषारी औषध प्राशन केले होते. औषधाचा परिणाम होऊन प्रकृती बिघडल्याचे लक्षात येताच नातेवाईकांनी त्याला तातडीने दापोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले.

मात्र, त्याची प्रकृती अधिकच चिंताजनक बनल्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने पुढील उपचारांसाठी १२ जुलै रोजी सकाळी ६ वाजता त्याला ॲम्ब्युलन्सने रत्नागिरी येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले.

उपचारादरम्यान मृत्यू व पोलीस ठाण्यात नोंद

रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मिलिंद याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. मात्र, उपचारादरम्यान १३ जुलै रोजी सायंकाळी ४.५५ वाजण्याच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून घोषित केले.

या घटनेबाबत मयताचे मेहुणे लहू रामचंद्र कदम यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. माहितीच्या आधारे पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद (अमृ. क्रमांक ५३/२०२६) केली आहे. मृतदेहाचे शवविच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून, घटनेचा पुढील अधिक तपास पोलीस करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:31 20-07-2026