देवरूखमध्ये गावठी दारूवर पोलिसांची धडक कारवाई: ९ लिटर दारूसह एकावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल

देवरूख पोलिसांकडून एकाला अटक, मुद्देमाल जप्त

देवरूखमध्ये गावठी दारू जप्त करत देवरूख पोलिसांनी अवैध दारूविक्रीविरोधात धडक कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ९ लिटर गावठी दारू जप्त केली असून एका व्यक्तीविरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

संतोष बंडू सावंत (वय ५२, रा. देवळे, कुंभारवाडी, ता. संगमेश्वर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे.

या प्रकरणी पोलीस शिपाई अनिल लक्ष्मण केतकर (बकल नंबर ९) यांनी देवरूख पोलीस ठाण्यात अधिकृत फिर्याद दिली आहे. फिर्यादीनुसार, १८ जुलै रोजी रात्री देवळे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील रवी इन्फ्रा कॅम्पजवळील एका बंद जनरल स्टोअरच्या मागच्या बाजूस संशयित हा विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या गावठी दारू बाळगून असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती.

छाप्यात ९ लिटर दारू जप्त; पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद

प्राप्त माहितीच्या आधारे देवरूख पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी छापा टाकला. या छाप्यात संशयिताच्या ताब्यातून ९५० रुपये किमतीची ९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

या प्रकरणी संशयित संतोष सावंत याच्याविरोधात देवरूख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, देवरूख पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 20-07-2026