चार तालुक्यांत शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस
रत्नागिरीत मुसळधार पाऊस सुरू झाल्याने संपूर्ण कोकणात जनजीवन प्रभावित झाले आहे. जिल्ह्यात रविवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोरदार हजेरी लावत अक्षरश: झोडपून काढले असून, अवघ्या २४ तासांत एकूण ८९४.६३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. १७ जुलैपासून पावसाने जिल्ह्यात दमदार पुनरागमन केले असून सलग तिसऱ्या दिवशीही हा जोर कायम आहे. या पावसामुळे खेड तालुक्यातील जगबुडी नदी ५.५० मीटरवर पोहोचल्याने प्रशासनाकडून इशारा पातळी जाहीर करण्यात आली आहे.
चार तालुक्यांत शंभर मिमीपेक्षा जास्त पाऊस
मध्यरात्री झालेल्या या जोरदार पावसाचा फटका जिल्हयातील अनेक भागांना बसला असून चार तालुक्यांमध्ये पावसाने १०० मिमीचा टप्पा पार केला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, चिपळूण तालुक्यात सर्वाधिक १२८.४४ मिमी, तर लांजा तालुक्यात १२७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय मंडणगड तालुक्यात १०७.७५ मिमी आणि खेड तालुक्यात १०५.१४ मिमी पाऊस झाला आहे. दापोली आणि गुहागर तालुक्यांतही अनुक्रमे ९५ मिमीपेक्षा अधिक पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.
नद्या आणि धरणांच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ
सतत पडणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत कमालीची वाढ झाली आहे. खेड येथील जगबुडी नदीने ५.५० मीटरवर पोहोचत इशारा पातळी गाठल्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याव्यतिरिक्त चिपळूणची वशिष्ठी नदी (३.१४ मी.), शास्त्री नदी (४.०० मी.), काजळी नदी (१३.७० मी.) आणि बावनदी (६.३२ मी.) यांच्या पाणीपातळीतही वाढ झाली आहे.
पावसाच्या या पुनरागमनामुळे धरणातील पाणीसाठ्यात लक्षणीय सुधारणा झाली आहे. लांजा तालुक्यातील मुचकुंदी धरण १०० टक्के भरले असून, अर्जुना धरणात ८२.५३ टक्के, गडानदी धरणात ८०.८० टक्के, तर नाटूवाडी धरणात ६७.४९ टक्के पाणीसाठा जमा झाला आहे.
बळीराजाला दिलासा; भात लावणीला वेग आणि पर्यटनाला चालना
जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे एकीकडे दैनंदिन जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी दुसरीकडे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण आहे. पावसामुळे रखडलेल्या भात लावणीच्या कामांना आता मोठा वेग आला आहे. तसेच, ग्रामीण व डोंगराळ भागातील धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाल्याने वर्षा पर्यटनालाही चालना मिळत आहे.
सिंधुदुर्गातही पावसाच्या सरी; शेतीकामांना गती
शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही जुलै महिन्याचे १० ते १२ दिवस दडी मारल्यानंतर पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. कणकवलीसह संपूर्ण जिल्ह्यात सोमवारी दिवसभर पावसाच्या सरीवर सरी कोसळत होत्या. यामुळे तेथील नदी-नाल्यांच्या पातळीत वाढ झाली असून रखडलेली भात लावणीची कामे आता अंतिम टप्प्यात आली आहेत. या पावसामुळे सिंधुदुर्गातील बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:01 21-07-2026














