Rajapur: सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्रीप्रकरणी १२ महिला मासेविक्रेत्यांना राजापूर न्यायालयाचा दणका; प्रत्येकी २ हजारांचा दंड

दंडाची रक्कम भरल्याने १२ महिलांचा सात दिवसांचा कारावास टळला; राजापूर नगर परिषदेची होती तक्रार

राजापूर: ‘राजापूर मासेविक्री दंड’ प्रकरणाने शहरातील मासेविक्रेत्यांचे आणि नगर परिषदेचे लक्ष वेधून घेतले आहे. सार्वजनिक रस्त्यावर मासेविक्री करून परिसरात प्रचंड दुर्गंधी व अस्वच्छता निर्माण केल्याप्रकरणी राजापूर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने १२ महिला मासेविक्रेत्यांवर कारवाई करत प्रत्येकी २,००० रुपयांचा दंड ठोठावला आहे. सर्व संबंधित महिलांनी न्यायालयात आपल्या गुन्ह्याची कबुली देत दंडाची रक्कम भरल्यामुळे त्यांची सात दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा टळली आहे.

शिवाजी पथ ते बाजारपेठ मार्गावर अस्वच्छतेची तक्रार

राजापूर शहरातील शिवाजी पथ ते बाजारपेठ या मुख्य मार्गावर १३ मार्च २०२६ रोजी सकाळी काही महिलांकडून सार्वजनिक रस्त्यावरच मासेविक्री सुरू असल्याची तक्रार राजापूर नगर परिषदेने केली होती. मासे स्वच्छ करताना त्यातील खवले आणि सांडपाणी थेट मुख्य रस्त्यावर फेकण्यात येत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत होती. नगर परिषदेकडून मासेविक्रीसाठी स्वतंत्र व हक्काची जागा उपलब्ध करून दिलेली असतानाही, मुख्य मार्गावरच मासेविक्री केली जात असल्याचे समोर आले होते.

पोलिसांकडून दोषारोपपत्र दाखल; न्यायालयात सुनावणी

या प्रकारानंतर राजापूर पोलिसांनी महाराष्ट्र नगरपालिका, नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियम, १९६५ तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ मधील तरतुदींनुसार १२ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणाची सुनावणी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी हाके यांच्या न्यायालयात पार पडली.

दंडाची रक्कम भरल्याने तुसुरुंगाची टांगती तलवार टळली

सुनावणीदरम्यान न्यायालयाने सर्व १२ महिलांना दोषी ठरवत प्रत्येकी २,००० रुपयांचा दंड ठोठावला. जर दंडाची रक्कम न भरल्यास ७ दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, सर्व महिलांनी तातडीने न्यायालयासमोर दंडाची रक्कम जमा केल्याने त्यांची कारागृहात रवानगी टळली. या प्रकरणाचा सखोल तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर खंडागळे यांनी केला असून कोर्ट पैरवी अधिकारी म्हणून सचिन बळीप यांनी कामकाज पाहिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:16 22-07-2026