२४ ते २५ जुलै दरम्यान राज्यभरात मुसळधार पावसाचा अंदाज; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
Maharashtra Weather Update: मुंबई :
बंगालच्या उपसागरावर निर्माण झालेल्या चक्राकार वाऱ्यांच्या सक्रियतेमुळे आणि पश्चिमेकडून वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यांमुळे महाराष्ट्रभरात पावसाने तीव्र रूप धारण केले आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २३ जुलै रोजी पुढील २४ तासांत राज्यातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पालघर जिल्हा तसेच नाशिक व पुणे जिल्ह्यांतील घाटमाथ्यासाठी पावसाचा ‘रेड अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
मुंबईसह उपनगरांत ‘ऑरेंज अलर्ट’ आणि कोकणातील स्थिती
अरबी समुद्राकडून येणाऱ्या तीव्र वाऱ्यांमुळे मुंबई, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांना पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. उत्तर कोकण, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या काही भागांवर दाट ढग जमा झाले असून, किनारपट्टी भागात पुढील काही तासांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. तसेच तळ कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी ‘यलो अलर्ट’ घोषित करण्यात आला आहे.
पालघरमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार, जनजीवन विस्कळीत
पालघर जिल्ह्यात रात्रभर वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांत रस्ते जलमय झाले असून वीजपुरवठा खंडित झाला आहे. हवामान विभागाने पालघर जिल्ह्यासाठी आजही ‘रेड अलर्ट’ कायम ठेवला आहे. दुसरीकडे सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरही सोसाट्याच्या वाऱ्यासह अतिमुसळधार पावसाची नोंद झाली आहे.
विदर्भ, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील पावसाचा अंदाज
मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर, लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली आणि धाराशिव भागात पावसाचा जोर वाढला आहे. प्रादेशिक हवामान केंद्रानुसार, पुढील काही तासांत मराठवाड्यातील धाराशिव, हिंगोली, लातूर, नांदेड व बीड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव आणि पूर्व विदर्भातील सर्व जिल्ह्यांत मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवत ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 23-07-2026














