राजापूर स्थानकात दोन वर्षांत दुसऱ्यांदा दुर्घटना; संपूर्ण बांधकामाची तांत्रिक तपासणी करण्याची मागणी
Rajapur Railway Station Incident: रत्नागिरी :
कोकण रेल्वे मार्गावरील राजापूर रोड रेल्वे स्थानकातील (तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी) प्रवासी प्रतीक्षालयाचे सिलिंग मंगळवारी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास अचानक कोसळल्याची घटना घडली. घटना घडली त्याच वेळी मुंबईकडे जाणारी कोकणकन्या एक्स्प्रेस स्थानकात दाखल होणार असल्याने प्रतीक्षालयातील सर्व प्रवासी प्लॅटफॉर्मवर गेले होते. यामुळे मोठा अपघात व संभाव्य जीवितहानी थोडक्यात टळली.
घटनास्थळाची पाहणी आणि तातडीने दुरुस्ती कार्य
घटना घडल्यानंतर स्थानक परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सिलिंगच्या ढिगाऱ्याखाली कोणी अडकले आहे का, याची रेल्वे कर्मचाऱ्यांनी तात्काळ खातरजमा केली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. घटनेची माहिती मिळताच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राजापूर विभागातील अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी पोहोचून पाहणी केली आणि कोसळलेले सिलिंग हटवून दुरुस्तीचे काम हाती घेतले.
दोन कोटींच्या सुशोभीकरणाचा दर्जा आणि दोन वर्षांत दुसऱ्यांदा दुर्घटना
शासनाच्या पर्यटन विकास योजनेअंतर्गत सुमारे दोन कोटी रुपये खर्चून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत राजापूर रोड रेल्वे स्थानकाचे सुशोभीकरण व आधुनिकीकरण करण्यात आले होते. मात्र, या सुशोभीकरणाचे काम सुरू असतानाच एकदा छप्पर कोसळले होते. आता अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत पुन्हा एकदा प्रतीक्षालयाचे सिलिंग कोसळल्याने या निकृष्ट दर्जाच्या बांधकामावर आणि प्रशासनाच्या देखभाल व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
तांत्रिक तपासणी व चौकशीची स्थानिक प्रवाशांची मागणी
या घटनेनंतर रेल्वे प्रवासी आणि स्थानिक नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी, तसेच प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्थानक परिसरातील सर्व इमारती व बांधकामांची तातडीने तांत्रिक तपासणी करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक स्तरावरून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 23-07-2026














