Khed Crime News: कशेडी सुतारवाडीत १० जणांच्या टोळक्याचा दांपत्यावर जीवघेणा हल्ला; खेड पोलिसांत गुन्हा दाखल

घरात घुसून लाठ्याकाठ्या, पाईप आणि कोयत्याने मारहाण; महिला फिर्यादीच्या तक्रारीवरून १० जणांविरोधात गंभीर गुन्हा दाखल

Khed Crime News: खेड :

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कशेडी सुतारवाडी येथे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कौटुंबिक वादातून किंवा पूर्ववैमनस्यातून १० जणांच्या टोळक्याने घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करत एका पती-पत्नीवर लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप, दगड आणि कोयत्याने जीवघेणा हल्ला केला. या प्रकरणी पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून खेड पोलीस ठाण्यात सर्व १० आरोपींविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

७ जून रोजी घडली घटना, २१ जुलै रोजी गुन्हा दाखल

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मारहाणीची ही घटना ७ जून रोजी सकाळी १०.०० वाजण्याच्या सुमारास कशेडी सुतारवाडी (तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी) येथे घडली होती. या प्रकरणी पीडित महिला सीमा सुरेश दरेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून २१ जुलै रोजी खेड पोलिसांत अधिकृतपणे गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

१० जणांच्या टोळक्याविरोधात खेड पोलिसांत गुन्हा

या घटनेप्रकरणी सीमा दरेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार एकूण १० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये स्थानिक रहिवासी तसेच सध्या मुंबई व खेड शहरात राहणाऱ्या व्यक्तींचा समावेश आहे.

गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे:

  • चंद्रकांत नारायण दरेकर
  • उज्ज्वला चंद्रकांत दरेकर
  • मनिष चंद्रकांत दरेकर
  • राजेश्री राजेश दरेकर
  • रघुनाथ मोरे (पूर्ण नाव माहीत नाही)
  • उर्मिला रघुनाथ मोरे (सर्व रा. कशेडी सुतारवाडी, ता. खेड, जि. रत्नागिरी)
  • विक्रांत चंद्रकांत दरेकर
  • प्राची विक्रांत दरेकर
  • तेजस मुकेश दरेकर (तिघेही मूळ रा. कशेडी सुतारवाडी, सध्या रा. मुंबई)
  • सुप्रिया प्रशांत पाटील (मूळ रा. कशेडी सुतारवाडी, सध्या रा. खेड, ता. खेड, जि. रत्नागिरी)

हातहात हत्यारे घेऊन घरात प्रवेश आणि लज्जास्पद कृत्य

घटना घडली त्यादिवशी फिर्यादी सीमा दरेकर आणि त्यांचे पती हे आपल्या घरी घरगुती काम करत होते. त्यावेळी आरोपी १ ते १० हे सर्व हातात लाठ्याकाठ्या, लोखंडी पाईप, दगड आणि कोयता असे प्राणघातक साहित्य घेऊन फिर्यादी व त्यांच्या पतीला मारण्याच्या उद्देशाने अंगावर धावून आले. या हल्ल्यादरम्यान आरोपींनी फिर्यादी महिलेला अश्लील शिवीगाळ करत तिच्या मनात लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा पुढील सखोल तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:29 23-07-2026