Ratnagiri Stray Cattle Menace: महामार्गावर मोकाट गुरांचा वाढता वावर; अपघातांच्या धोक्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी युवासेनेचे उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन

ग्रामपंचायतींमार्फत जनजागृती करून दंडात्मक कारवाई करण्याची मागणी

Ratnagiri Stray Cattle Menace: रत्नागिरी :

महामार्गावर गेल्या काही दिवसांपासून मोकाट गुरांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला असून, यामुळे रात्रीच्या वेळी अपघात होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या गंभीर समस्येकडे प्रशासनाने तातडीने लक्ष द्यावे, या मागणीसाठी युवासेना रत्नागिरी जिल्हा युवाधिकारी प्रसाद सावंत यांनी उपविभागीय अधिकारी यांना अधिकृतपणे निवेदन सादर केले आहे.

युवासेनेच्या महत्त्वाच्या मागण्या आणि ग्रामपंचायतींना सूचना

महामार्गावरील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी युवासेनेने प्रशासनाकडे विविध उपाययोजनांची मागणी केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींना लेखी सूचना देण्यात यावी की नागरिकांनी आपली गुरे महामार्गावर मोकाट सोडू नयेत आणि याबाबत गावात जनजागृती करावी. तसेच, गुरांसाठी सुरक्षित गोठा उपलब्ध करून द्यावा आणि रस्त्यावर मोकाट गुरे आढळल्यास त्यांच्यावर ग्रामपंचायत स्तरावर कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी युवासेनेने केली आहे.

मान्यवरांची उपस्थिती

निवेदन सादर करताना युवासेनेचे अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये तालुकाप्रमुख मयूरेश्वर पाटील, शहरप्रमुख प्रशांत साळुंखे, उपतालुका प्रमुख विजय देसाई, संदेश नारगुडे, किरण तोडणकर, सचिन सावंतदेसाई, प्रशांत रायंगणकर, सुफियान जयगडकर, नंदकुमार कदम, सायली पवार, मिताली पवार, गंधाली मयेकर आणि सेजल बोराटे आदींचा समावेश होता.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
13:09 23-07-2026