घरात कोणी नसताना नराधमाचा घुसखोरीचा प्रयत्न; पीडितेच्या आरडाओरड्यानंतर नागरिकांची धाव, आरोपीवर पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
Rajapur Crime News: राजापूर :
रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यात एका गावात २१ जुलै रोजी दुपारी अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. घरात कोणी नसण्याचा गैरफायदा घेत संशयित आरोपी नरेश काशीराम गुरव याने एका अल्पवयीन मुलीच्या घरात बेकायदेशीरपणे प्रवेश करून तिच्यावर अत्याचाराचा प्रयत्न केला. मात्र, पीडित मुलीने दाखवलेल्या प्रसंगावधान आणि धाडसामुळे हा भयंकर प्रकार टळला आहे.
पीडितेच्या आरडाओरड्याने नागरिक धावले; आरोपीला रंगेहात पकडले
घटना घडत असताना पीडित अल्पवयीन मुलीने अजिबात घाबरून न जाता हिमतीने आरडाओरडा केला. तिचा आवाज ऐकून आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्याच वेळी पीडितेचे वडीलही घरात पोहोचल्याने आरोपीचा हा विकृत डाव उघडा पडला. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली.
राजापूर पोलिसांची तत्परता; आरोपीला तातडीने अटक
घटनेची गंभीर दखल घेत राजापूर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी पोहोचून आरोपी नरेश काशीराम गुरव याला ताब्यात घेतले आणि बेड्या ठोकल्या. संशयित आरोपीवर भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७४, ७५(१), ७६ तसेच लहान मुलांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण (POCSO) कायद्याच्या कलम ८ आणि १२ अन्वये गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक अमित यादव यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
नागरिकांमधून तीव्र संताप आणि कडक शिक्षेची मागणी
भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे राजापूर तालुक्यासह संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. महिला व अल्पवयीन मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला असून, अशा विकृत मानसिकतेच्या नराधमाला कायद्यानुसार जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:18 23-07-2026














