Dapoli Accident : टेटवलीकडे जाताना ज्युपिटर दुचाकीचा अपघात; वाहत्या पाण्याच्या मोरीत पडल्याने दुर्घटना
रत्नागिरी : Dapoli Accident प्रकरणात दापोली तालुक्यातील शिरशिंगे फाटा येथे दुचाकी घसरून झालेल्या अपघातात २२ वर्षीय तरुणीचा मृत्यू झाला, तर तिची मैत्रीण जखमी झाली. सोमवारी (२८ जुलै) सकाळी ही घटना घडली. दोघींना ग्रामस्थ आणि पोलिसांच्या मदतीने बाहेर काढून उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी सेजल भागवत हिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले.
टेटवलीकडे जात असताना अपघात
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सेजल पांडुरंग भागवत (वय २२, रा. टेटवली, खुटाचा कोंड, ता. दापोली) ही तिची बालमैत्रीण वैष्णवी चंद्रकांत आयरे (वय २२) हिच्यासोबत घरातील ज्युपिटर दुचाकी (क्र. MH-08-BJ-9963) घेऊन दापोली-वाकवली मार्गे टेटवलीकडे निघाली होती.
दुचाकी घसरून दोघी मोरीत पडल्या
सकाळी सुमारे ८.३० वाजता शिरशिंगे फाटा येथे दुचाकी घसरल्याने दोघीही रस्त्यालगतच्या वाहत्या पाण्याच्या मोरीत पडल्या. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत दोघींना बाहेर काढले.
रुग्णालयात उपचारापूर्वीच मृत घोषित
सेजल भागवत बेशुद्धावस्थेत असल्याने तिला आणि तिच्या मैत्रिणीला उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर सकाळी ९.५० वाजता सेजल भागवत हिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. वैष्णवी आयरे हिच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
आकस्मिक मृत्यूची नोंद
या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू क्रमांक ५७/२०२६ अशी बी.एन.एस.एस. कलम १९४ अन्वये नोंद करण्यात आली असून, अपघाताच्या नेमक्या कारणांचा पुढील तपास दापोली पोलीस करत आहेत.














