टेम्पो रिव्हर्स घेताना मोटारीला लागलेल्या धडकेवरून पेटला वाद; लोखंडी टॉमीने मारहाण, दोघेजण जखमी
रत्नागिरी:
Ratnagiri Crime News अंतर्गत तालुक्यातील टिके-भाताडेवाडी येथे टेम्पो पार्किंगसाठी रिव्हर्स घेताना मोटारीला किरकोळ धडक लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये भीषण वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या हाणामारीत दोन्ही बाजूंचे दोघेजण जखमी झाले असून, या प्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादींवरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी (ता. ३ ऑगस्ट) सायंकाळी सुमारे सव्वा सात वाजण्याच्या सुमारास टिके-भाताडेवाडी येथील अंतर्गत रस्त्यावर सर्वेश भाताडे यांच्या घराजवळील पार्किंगच्या ठिकाणी घडली. आकाश चंद्रकांत गोताड (वय ३१, रा. टिके-भाताडेवाडी) यांनी दिलेल्या पहिल्या फिर्यादीनुसार, ते आपला टेम्पो (क्रमांक एमएच-०८ बीके-१६४७) पार्किंगसाठी रिव्हर्स घेत असताना सर्वेश भाताडे यांच्या मोटारीला किरकोळ धडक लागली. या कारणावरून सर्वेश भाताडे, गजानन भाताडे, यतीन भाताडे, सुहास भाताडे व अथर्व भाताडे यांनी मिळून कोणत्याही तरी वस्तूने मारहाण करून दुखापत केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेत आकाश गोताड जखमी झाले आहेत.
दुसऱ्या बाजूने, यतीन कृष्णा भाताडे (वय ३८, रा. टिके-भाताडेवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीत वेगळी हकीकत समोर आली आहे. त्यांचा भाऊ सर्वेश व चुलत भाऊ सुहास गोपाळ भाताडे हे आपली बोलेरो मोटार उभी करत असताना आकाश गोताड याने टेम्पो रिव्हर्स घेत वाहनाला धडक दिली. याबाबत विचारणा केली असता, आकाश गोताड याने हातातील लोखंडी टॉमीने प्रथम सुहास भाताडे यांच्यावर वार केला. त्यानंतर सुहास यांच्या मदतीला धावलेले यतीन भाताडे यांच्या कपाळावर व उजव्या हातावरही टॉमीने मारून दुखापत केली. या मारहाणीत यतीन भाताडे जखमी झाले आहेत.
या सर्व घटनेनंतर दोन्ही पक्षांनी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रारी नोंदवल्या आहेत. पोलिसांनी परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस अधिकारी करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 06-08-2026














