Diva Ratnagiri Passenger Train: दिवा-रत्नागिरी पॅसेंजरमध्ये प्रवाशांचे हाल; अस्वच्छता, दुर्गंधी आणि पाण्याच्या तुटवड्यामुळे प्रवासी त्रस्त

कोकण रेल्वेच्या कारभारावर प्रवाशांचा तीव्र संताप; तक्रार निवारण यंत्रणा कुचकामी ठरल्याचा आरोप

आरवली:

Diva Ratnagiri Passenger Train च्या अस्वच्छता आणि प्राथमिक सुविधांच्या अभावामुळे कोकण रेल्वे मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गाडीतील वाढती अस्वच्छता, वॉश बेसिनमध्ये साचलेले घाणेरडे पाणी आणि स्वच्छतागृहातील दुर्गंधीमुळे प्रवासी प्रचंड त्रस्त झाले असून, कोकण रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

दररोज हजारो नोकरदार, विद्यार्थी आणि ग्रामीण भागातील नागरिक या दिवा-रत्नागिरी पॅसेंजर गाडीवर अवलंबून असतात. मात्र, मंगळवारी या गाडीने प्रवास केलेल्या प्रवाशांनी गाडीतील बिकट परिस्थितीची माहिती दिली. डब्याच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या वॉश बेसिनमध्ये तासंतास घाणेरडे पाणी साचून राहते, ज्यामुळे संपूर्ण डब्यात दुर्गंधी पसरते आणि पाय घसरून पडण्याची भीती निर्माण होते.

त्याहून बिकट परिस्थिती स्वच्छतागृहांची आहे. स्वच्छतागृहात पाणी उपलब्ध नसल्याने फ्लश चालत नाहीत, तर फरशीवर घाण साचलेली असते. अनेक डब्यांचे दरवाजे तुटलेल्या अवस्थेत आहेत. ६ ते ७ तासांच्या प्रवासात लहान मुले, महिला, वृद्ध आणि आजारी प्रवाशांना यामुळे प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गाडी सुटण्यापूर्वी किंवा मोठ्या स्थानकांवर सफाई कर्मचारी दिसत नाहीत; कचऱ्याचे डबे भरून वाहत असून सीटखाली आणि खिडकीत कचरा पडून राहत असल्याची तक्रार प्रवाशांनी केली आहे.

तिकीट काढूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची खंत व्यक्त करत प्रवाशांनी सांगितले की, तक्रार करण्यासाठी कोकण रेल्वेचा टोल फ्री नंबर लागत नाही आणि स्थानकावर सांगूनही कोणी दखल घेत नाही. या पार्श्वभूमीवर, प्रत्येक फेरीपूर्वी डब्यांची सखोल सफाई करावी, स्वच्छतागृहात २४ तास पाणी उपलब्ध ठेवावे आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांवर देखरेखीसाठी पर्यवेक्षक नेमावा, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे. प्रशासनाने तातडीने लक्ष न दिल्यास प्रवासी संघटनांसोबत आंदोलन छेडण्याचा इशारा प्रवाशांनी दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:16 06-08-2026