‘पृथ्वीमातेला एक पत्र: निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन’ विषयावर स्पर्धा; ३१ ऑक्टोबर २०२६ पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन
रत्नागिरी:
Dhai Akhar Letter Writing Competition 2026 अंतर्गत भारतीय टपाल विभागातर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही राष्ट्रीय स्तरावरील ‘ढाई आखर’ पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी ‘A Letter to Mother Earth: My Promise to Protect Nature’ (पृथ्वीमातेला एक पत्र: निसर्गाचे रक्षण करण्याचे माझे वचन) या मध्यवर्ती संकल्पनेवर ही स्पर्धा पार पडणार आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त विद्यार्थी आणि नागरिकांनी या स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन रत्नागिरी विभागाचे डाकघर अधीक्षक अ. द. सरंगले यांनी केले आहे.
सध्याच्या डिजिटल युगात पत्रलेखनाची कला काहीशी मागे पडली असली, तरी पत्रांचे भावनिक महत्त्व आणि माणसांमधील जिव्हाळा आजही अबाधित आहे. नागरिकांना आपले विचार, भावना, कल्पना आणि लेखनकौशल्य मोकळेपणाने व्यक्त करण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने टपाल विभागातर्फे २०१७ पासून ही स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केली जात आहे. यंदा ही स्पर्धा १ ऑगस्ट ते ३१ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.
स्पर्धेची नियमावली व स्वरूप:
- पात्रता: कोणताही भारतीय नागरिक या स्पर्धेत सहभागी होऊ शकतो.
- भाषा: पत्र मराठी, हिंदी, इंग्रजी किंवा कोणत्याही स्थानिक भाषेत स्वहस्ताक्षरात लिहिणे बंधनकारक आहे.
- माध्यम व शब्दमर्यादा:
- अंतर्देशीय पत्र (Inland Letter): कमाल ५०० शब्द.
- साधा लखोटा (A4 साइज कागद व Envelope): कमाल १००० शब्द.
- वयोगट: स्पर्धा दोन वयोगटांत घेतली जाईल –
- १८ वर्षांपर्यंत (१८ वर्षे पूर्ण नसलेले)
- १८ वर्षांवरील
- वयाचा दाखला: पत्रावर खालीलप्रमाणे स्वहस्ताक्षरात प्रतिज्ञापत्र लिहिणे अनिवार्य आहे:“मी असा/अशी दाखला देतो/देते की, दि. ०१ जानेवारी २०२६ रोजी माझे वय १८ वर्षांखालील / १८ वर्षांवरील गटात समाविष्ट आहे.”(I certify that I am below/above the age of 18 as on 01 January 2026)
राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील भरघोस बक्षिसे:
१. राज्य स्तर (महाराष्ट्र सर्कल – प्रत्येक गटासाठी):
- प्रथम क्रमांक: ₹ २५,०००/-
- द्वितीय क्रमांक: ₹ १०,०००/-
- तृतीय क्रमांक: ₹ ५,०००/-
२. राष्ट्रीय स्तर: राज्य स्तरावरील उत्कृष्ट ३ पत्रे राष्ट्रीय स्तरावर पाठवली जातील. तेथील विजेत्यांना खालीलप्रमाणे पारितोषिके मिळतील:
- प्रथम क्रमांक: ₹ ५०,०००/-
- द्वितीय क्रमांक: ₹ २५,०००/-
- तृतीय क्रमांक: ₹ १०,०००/-
पत्र पाठवण्याचा पत्ता व अंतिम मुदत:
स्पर्धकांनी आपले स्वहस्ताक्षरातील पत्र ३१ ऑक्टोबर २०२६ पूर्वी जवळच्या टपाल कार्यालयातून (Post Office) खालील पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे:
पत्ता:
मुख्य पोस्टमास्टर जनरल,
महाराष्ट्र सर्कल ऑफिस,
मुंबई – ४००००१.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 06-08-2026














