रत्नागिरीतील अध्यात्म मंदिरात ८ आणि ९ ऑगस्ट रोजी कीर्तन महोत्सव; नागरिकांना लाभ घेण्याचे आवाहन
रत्नागिरी:
Swami Swarupanand Seva Mandal Keertan उपक्रमांतर्गत स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस (रत्नागिरी) आणि रत्नागिरी कीर्तनकार मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या ‘एकादशी कीर्तन सेवा’ उपक्रमाला एक वर्ष पूर्ण होत आहे. या उपक्रमाचा एक वर्षाचा म्हणजे तपपूर्ती सोहळा शनिवार, ८ ऑगस्ट आणि रविवार, ९ ऑगस्ट २०२६ रोजी रत्नागिरीतील अध्यात्म मंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे.
गेल्या वर्षभरापासून प्रत्येक एकादशीला अखंडपणे सुरू असलेल्या या कीर्तन सेवेच्या तपपूर्ती सोहळ्यानिमित्त दोन दिवसीय विशेष कीर्तन महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
दोन दिवसीय कीर्तन महोत्सवाची रूपरेषा:
- शनिवार, ८ ऑगस्ट २०२६:पहिल्या दिवशी ह.भ.प. यश सोवनी हे पूर्वरंग रंगवणार असून, त्यानंतर ह.भ.प. अमृताताई नवाथे या उत्तररंग उलगडणार आहेत.
- रविवार, ९ ऑगस्ट २०२६:दुसऱ्या दिवशी ह.भ.प. श्री. महेशबुवा सरदेसाई हे पूर्वरंग मांडणार आहेत. तर ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे ही कीर्तन सेवा वर्षभर यशस्वीपणे सुरू राहिली आणि पुढेही अखंड सुरू राहणार आहे, ते ह.भ.प. प्रवीणबुवा मुळ्ये उत्तररंगात आपली सेवा सादर करतील.
रत्नागिरीतील सर्व भाविक आणि नागरिकांनी या दोन दिवसीय कीर्तनसेवेचा व नामस्मरणाचा लाभ घ्यावा, असे विशेष आवाहन स्वरूपानंद सेवा मंडळ, पावस यांच्यातर्फे श्री. जयंतराव देसाई आणि श्री. ऋषिकेश पटवर्धन यांनी केले आहे.
त्याचप्रमाणे, जिल्ह्यातील सर्व कीर्तनकारांनी या सोहळ्यास उपस्थित राहून आपली सेवा रुजू करावी आणि या उपक्रमाला कृतिशील सहाय्य करावे, असे आवाहन रत्नागिरी कीर्तनकार मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:02 06-08-2026














