गोगटे जोगळेकर कॉलेजचा सायबर वॉरियर क्लब आणि क्विक हिल फौंडेशनचा संयुक्त उपक्रम; शेवटी सायबर सुरक्षेची शपथ
रत्नागिरी: Cyber Shiksha For Cyber Suraksha या उपक्रमाअंतर्गत गोगटे जोगळेकर कॉलेज, रत्नागिरी येथील ‘सायबर वॉरियर क्लब’ आणि ‘क्विक हिल फौंडेशन’ यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीमती राधाबाई गोपाळ जागुष्टे हायस्कूल, कुवारबाव (रत्नागिरी) येथे सायबर जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. मुख्याध्यापक श्री. भास्कर झोरे सर व सौ. चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम अत्यंत उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षेविषयी जनजागृती निर्माण करणे, वाढत्या सायबर गुन्ह्यांपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक ज्ञान देणे आणि विद्यार्थ्यांना जबाबदार व सजग डिजिटल नागरिक बनवणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.
कार्यक्रमादरम्यान सध्या घडणाऱ्या विविध डिजिटल फसवणुकीच्या प्रकारांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने:
- ओटीपी फसवणूक (OTP Fraud) आणि फिशिंग (Phishing)
- सोशल मीडिया व गेमिंग फ्रॉड
- बनावट लिंक आणि क्यूआर कोड (QR Code) फसवणूक
- सायबर बुलिंग आणि डिजिटल गोपनीयता
- सुरक्षित ऑनलाइन व्यवहार
यांसारख्या अत्यंत महत्त्वाच्या विषयांवर सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणानंतर आयोजित संवादात्मक सत्रात विद्यार्थ्यांच्या विविध शंकांचे निरसन करण्यात आले.
या वेळी सायबर वॉरियर क्लबचे सदस्य राज गुरव, आयुष सनगरे, अनुष्का झगडे आणि पूर्वा सुर्वे यांनी विद्यार्थ्यांना सायबर गुन्हे टाळण्यासाठी आवश्यक सावधगिरीचे उपाय समजावून सांगितले. मजबूत पासवर्डचा वापर करणे, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणाशीही शेअर न करणे, संशयास्पद लिंकवर क्लिक न करणे आणि सोशल मीडियाचा सुरक्षित वापर करणे याबाबत त्यांनी प्रभावी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व शिक्षक व विद्यार्थ्यांनी डिजिटल माध्यमांचा जबाबदारीने, सुरक्षितपणे आणि सजगतेने वापर करण्याची सायबर सुरक्षा शपथ घेतली. ‘सायबर सुरक्षित भारत’ घडविण्याच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले असून विद्यार्थ्यांकडून या उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:37 06-08-2026














