६ वर्षांच्या थकीत करांपैकी ५० टक्के रक्कम जमा; गुहागर पंचायत समितीमध्ये आढावा
गुहागर: गुहागर तालुक्यातील रत्नागिरी गॅस पॉवर प्रोजेक्ट लिमिटेड (RGPPL – आरजीपीपीएल) कंपनीने अखेर अंजनवेल, वेलदूर आणि रानवी या तीन ग्रामपंचायतींना ७ कोटी १ लाख २० हजार ७२७ रुपयांचा कर अदा केला आहे. गेल्या ६ वर्षांच्या थकीत करांपैकी ५० टक्के रक्कम कंपनीने जमा केल्यामुळे कंपनीच्या मालमत्तेवर होणारी जप्तीची कारवाई तूर्तास टळली आहे.
आरजीपीपीएल कंपनीने “आम्ही सरकारी कंपनी असल्याने इमारत व जमीन कर लागू होत नाही” अशी भूमिका घेतली होती. या वादावर गुहागर पंचायत समिती, जिल्हा परिषद स्तर आणि सुनावणी होऊन निर्णय अंजनवेल, वेलदूर व रानवी ग्रामपंचायतींच्या बाजूने लागला होता. कंपनीने या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती.
जप्तीचा इशारा आणि पालकमंत्र्यांची मध्यस्थी
कर वसुलीसाठी तिन्ही ग्रामपंचायतींनी ‘महाराष्ट्र ग्रामपंचायत कायद्या’नुसार २८ जुलै २०२६ रोजी कंपनीच्या मालमत्तेवर जप्तीच्या कारवाईचा इशारा दिला होता. जप्तीची कारवाई होणार असल्याची माहिती मिळताच पालकमंत्री उदय सामंत यांनी वस्तूस्थिती जाणून घेतली. त्यानंतर गटविकास अधिकाऱ्यांनी तिन्ही ग्रामपंचायती आणि कंपनी प्रशासनाची संयुक्त बैठक घेऊन सकारात्मक तोडगा काढला.
कंपनी प्रशासनाने तातडीने ५० टक्के कर भरण्याचा प्रस्ताव मांडून जप्तीची कारवाई स्थगित करण्याची विनंती केली. या बैठकीस आरजीपीपीएलचे प्रतिनिधी अतुल देसाई उपस्थित होते.
ग्रामपंचायतींना मिळालेला निधी
कंपनीने २०२१-२२ ते २०२६-२७ या कालावधीतील एकूण कराच्या ५० टक्के रक्कम भरण्याची तयारी दर्शवल्यानुसार तिन्ही ग्रामपंचायतींच्या खात्यात निम्मी रक्कम वर्ग करण्यात आली आहे:
| ग्रामपंचायत | प्राप्त निधी (रुपये) |
|---|---|
| अंजनवेल | ₹४,७५,५४,१५८ |
| रानवी | ₹१,२४,३७,०४२ |
| वेलदूर | ₹१,०१,२९,५२७ |
उर्वरित ५० टक्के थकीत कराची रक्कमही कंपनीकडून वसूल करण्यासाठी कायदेशीर प्रयत्न सुरू ठेवण्यात येतील, असा विश्वास पंचायत समितीचे सभापती प्रणव पोळेकर आणि उपसभापती निलेश सुर्वे यांनी व्यक्त केला. या यशस्वी वसुलीनंतर तिन्ही ग्रामपंचायतींचे सरपंच, सदस्य आणि ग्रामस्थांचे अभिनंदन करण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
09:01 07-08-2026














