Rajapur Stray Cattle Action: राजापुरातील १३ मोकाट गुरांची चिपळूण येथील गोशाळेत रवानगी; नगरपरिषद प्रशासनाची कठोर कारवाई

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे व मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम यशस्वी; मोकाट गुरांविरोधातील धरपकड यापुढेही राहणार सुरू

राजापूर: राजापूर शहरातील व्यापारी, स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि वाहनचालकांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या मोकाट गुरांच्या गंभीर प्रश्नावर राजापूर नगरपरिषद प्रशासनाने अत्यंत कठोर भूमिका घेतली आहे. विशेष धरपकड मोहिमेत पकडलेल्या १३ मोकाट गुरांची सर्व आवश्यक शासकीय व वैद्यकीय प्रक्रिया पूर्ण करून त्यांची चिपळूण येथील गोशाळेत सुरक्षित रवानगी करण्यात आली आहे. वारंवार आवाहन करूनही गुरेमालकांनी दाखवलेल्या असहकार्यामुळे प्रशासनाला हा निर्णय घ्यावा लागल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

राजापूर शहरासह परिसरातील अनेक गुरे बाजारपेठ, प्रमुख रस्ते आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाटपणे वावरत होती. यामुळे व्यापारी, नागरिक, विद्यार्थी तसेच गुरुवारच्या आठवडा बाजारासाठी येणारे बाहेरील व्यापारी व वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. या गुरांमुळे शहरात अनेक लहान-मोठे अपघात घडून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत होती. यापूर्वी नगरपरिषदेने पकडलेली गुरे मालकांच्या ताब्यात दिली होती; मात्र, काही दिवसांतच तीच गुरे पुन्हा रस्त्यावर दिसू लागल्याने प्रशासनाने यावेळी अधिक आक्रमक पाऊल उचलले.

कोंडवाड्यात २०-२५ दिवस चारा-पाण्याची व्यवस्था

नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्वसाधारण सभेत सर्व नगरसेवकांनी घेतलेल्या निर्णयानुसार मुख्याधिकारी अभिजीत कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी विशेष मोहीम राबवून १३ मोकाट गुरांची धरपकड केली होती. ही गुरे जुन्या रेस्ट हाऊस परिसरातील कोंडवाड्यात ठेवण्यात आली होती. सुमारे २० ते २५ दिवस नगरपरिषदेतर्फे त्यांना चारा, पाणी आणि आवश्यक देखभाल पुरविण्यात आली.

घंटागाडीच्या माध्यमातून वारंवार दंडात्मक कारवाईचा इशारा देत गुरे ताब्यात घेण्याचे आवाहन केले गेले. काही मालकांनी दंड भरून आपली गुरे परत नेली आणि भविष्यात मोकाट न सोडण्याचे हमीपत्र दिले. मात्र, उर्वरित १३ गुरांचे मालक पुढे न आल्याने अखेर नगरपरिषदेने कायदेशीर प्रक्रिया, वैद्यकीय तपासणी आणि संबंधित विभागांशी पत्रव्यवहार पूर्ण करून सर्व गुरांची चिपळूण येथील गोशाळेत रवानगी केली.

गुरे मोकाट सोडल्यास दंडात्मक कारवाईचा इशारा

दरम्यान, राजापूर शहरातील मोकाट गुरांविरोधातील धरपकड मोहीम यापुढेही अशीच तीव्रतेने सुरू राहणार असल्याचे नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट केले आहे. गुरेमालकांनी आपली गुरे रस्त्यावर मोकाट सोडू नयेत, अन्यथा नियमानुसार कडक दंडात्मक कारवाईसह कायदेशीर उपाययोजना केल्या जातील, असा सज्जड इशारा प्रशासनाने दिला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 07-08-2026