उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी आणि लावणी; दमदार पावसामुळे बळीराजा सुखावला
रत्नागिरी:
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यात जुलै व ऑगस्ट महिन्यात झालेल्या दमदार आणि मुसळधार पावसामुळे खरीप हंगाम २०२६ साठी भात आणि नाचणीची लावणी यशस्वीरीत्या पूर्ण झाली आहे. जिल्ह्यात ५३ हजार ६०० हेक्टर क्षेत्रावर लावणीचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते, मात्र यंदा उद्दिष्टापेक्षा अधिक म्हणजेच तब्बल ५३ हजार ६३५ हेक्टर क्षेत्रावर भात व नाचणीची लावणी पूर्ण झाली आहे.
एकूण लावणीपैकी ४८,००० हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची, तर ५,६३५ हेक्टर क्षेत्रावर नाचणीची लावणी करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक भात लावणी संगमेश्वर, चिपळूण आणि रत्नागिरी तालुक्यात झाली असून, सर्वात कमी लावणी मंडणगड आणि गुहागर तालुक्यात नोंदवली गेली आहे.
तालुकानिहाय भात आणि नाचणी लावणीची आकडेवारी (हेक्टरी):
| तालुका | भात (हेक्टर) | नाचणी (हेक्टर) | एकूण लावणी (हेक्टर) |
|---|---|---|---|
| रत्नागिरी | ६,९०० | ७१५ | ६,६१५ |
| लांजा | ३,६७९ | ३६० | ४,०३९ |
| राजापूर | ६,३६८ | ६९० | ७,०५८ |
| संगमेश्वर | ८,३०३ | ९०० | ९,२०३ |
| गुहागर | २,६९९ | १५१० | ४,२०९ |
| चिपळूण | ७,४३७ | ६६० | ८,०९७ |
| खेड | ५,७४० | ८१० | ६,५५० |
| दापोली | ४,४२० | ६३० | ५,०५० |
| मंडणगड | २४५४ | १६० | २,६१४ |
| एकूण | ४८,००० | ५,६३५ | ५३,६३५ |
(माहिती स्रोत: जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय, रत्नागिरी)
सुरुवातीला हुलकावणी, पण जुलै-ऑगस्टच्या पावसाने तारले
यंदा रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनचे आगमन उशिराने झाले. जून महिन्यात केवळ ४ ते ५ दिवस पाऊस पडल्यानंतर पावसाने ओढ दिली होती, ज्यामुळे भाताची रोपे पिवळी पडू लागली होती. मात्र, जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार आणि संततधार पावसाचे पुनरागमन झाले.
जुलै आणि ऑगस्टमध्ये झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मजूर लावून व कुटुंबातील सदस्यांच्या मदतीने लावणीची कामे वेगाने पूर्ण केली. लावणीची कामे आटोपल्याने अखेर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी मोकळा श्वास घेतला असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
“जिल्ह्यात मुसळधार आणि संततधार पावसामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यंदा उद्दिष्टापेक्षा जास्त क्षेत्रावर भात आणि नाचणीची लावणी झाली असून सर्वाधिक भाताची पुनर्लागवड झाली आहे. जिल्ह्यात एकूण ५३,६३५ हेक्टर क्षेत्रावर लावणी पूर्ण झाली आहे.”
— शिवकुमार सदाफुले (जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, रत्नागिरी)
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:37 07-08-2026














