४ कोटींचा निधी खर्चूनही देखभालीअभावी सार्वजनिक बांधकाम विभागाचा ढिसाळपणा उघड
माखजन: Khereshet Kase Pedhambe Road (खैरशेत-कासे-पेढांबे रस्ता): संगमेश्वर तालुक्यातील कासे-कळंबुशी आणि पेढांबे या गावांना जोडणाऱ्या खैरशेत-कासे-पेढांबे रस्त्यालगत दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडी वाढल्याने हा मार्ग सध्या वाहनधारकांसाठी अत्यंत धोकादायक ठरत आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पसरलेल्या झाडीमुळे समोरून येणारे वाहन वेळेत दिसत नसल्याने वाहनांची समोरासमोर धडक होण्याचे आणि अचानक ब्रेक लावल्याने दुचाकीस्वार घसरून पडण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत.
४ कोटींचा निधी खर्चूनही झाडीमुळे रस्त्याची दुरवस्था
या मार्गाच्या कामासाठी शासनाकडून तब्बल ४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला होता. मात्र, रस्ता पूर्ण झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्या दुतर्फा वाढलेल्या झाडीची वेळेवर छाटणी न केल्यामुळे प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आला आहे. झाडीसोबतच काही ठिकाणी रस्त्याची दुरवस्था झाली असून खड्डे पडण्यास सुरुवात झाली आहे.
एसटी बसेस आणि मोठ्या वाहनांची सतत वाहतूक
खैरशेत मार्गे दररोज अनेक एसटी बसेसची ये-जा सुरू असते. यातील काही बसेस थेट माखजनपर्यंत धावतात. याशिवाय विविध कामानिमित्त मोठी व्यावसायिक वाहनेही याच मार्गाचा वापर करतात. रस्त्यावरील नागमोडी वळणांवर वाढलेली झाडी थेट अपघाताला आमंत्रण देत असल्याने प्रवाशांमध्ये आणि वाहनधारकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
दुतर्फा झाडी तातडीने तोडण्याची ग्रामस्थांची मागणी
रस्त्यावरील वाढलेली झाडी तातडीने तोडून रस्ता मोकळा करावा, जेणेकरून संभाव्य मोठे अपघात टळू शकतील, अशी जोरदार मागणी परिसरातील ग्रामस्थांकडून केली जात आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने या समस्येकडे तत्काळ लक्ष देऊन झाडीची छाटणी करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:59 08-08-2026














