उद्योगमंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; येत्या १० दिवसांत शासन आदेश काढण्याचे मंत्री अतुल सावे यांचे निर्देश
मुंबई / रत्नागिरी : वैश्य समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) जातीचा दाखला मिळण्यात येणाऱ्या सर्व तांत्रिक आणि प्रशासकीय अडचणी आता कायमस्वरूपी दूर होणार आहेत. यासंदर्भात आज मंत्रालयात इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे यांच्या अध्यक्षतेखाली एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. उद्योग व मराठी भाषा मंत्री ना. उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांच्या विशेष पुढाकाराने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
नोंदींमधील तफावतीमुळे विद्यार्थ्यांना बसत होता फटका
वैश्य समाजाला ओबीसी प्रवर्गाच्या सवलती मिळून अनेक वर्षे झाली आहेत. मात्र, जुन्या कागदपत्रांमधील नोंदींच्या विसंगतीमुळे दाखले मिळवताना अडचणी येत होत्या:
उल्लेखातील तफावत: कागदपत्रांमध्ये काही ठिकाणी ‘वैश्य वाणी’, काही ठिकाणी केवळ ‘वैश्य’, तर काही ठिकाणी ‘हिंदू वै. वाणी’ असा उल्लेख असल्याने महसूल विभागाकडून दाखले मिळण्यात तांत्रिक अडथळे येत होते.
विद्यार्थ्यांचे नुकसान : या नोंदींच्या गोंधळामुळे प्रामुख्याने शैक्षणिक प्रवेशाच्या वेळी विद्यार्थ्यांना ओबीसी प्रवर्गाचा लाभ मिळवण्यात अडचणी येत होत्या आणि अनेक गुणवंत विद्यार्थ्यांना सवलतींपासून वंचित राहावे लागत होते.
तीन वर्षांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश
वैश्य समाजाची ही गंभीर अडचण ‘रत्नागिरी खबरदार’चे संपादक हेमंत वणजू आणि नगरसेवक सौरभ मलुष्टे यांनी मंत्री उदय सामंत व आमदार किरण सामंत यांच्या निदर्शनास आणून दिली होती. गेल्या तीन वर्षांपासून यासाठी सातत्याने पाठपुरावा करून मंत्रालयात संबंधित विभागांकडे बैठकांचे आयोजन करण्यात येत होते.
आज झालेल्या मंत्रालयातील बैठकीत या विषयावर सखोल चर्चा होऊन सकारात्मक निर्णय घेण्यात आला. येत्या १० दिवसांच्या आत संबंधित विभागाने यासंदर्भातील अधिकृत आदेश काढावेत, अशा स्पष्ट सूचना मंत्री अतुल सावे यांनी प्रशासनाला दिल्या आहेत. या निर्णयामुळे वैश्य समाजाला जातीचा दाखला मिळताना येणारे सर्व अडथळे आता संपुष्टात येणार आहेत.
बैठकीस मान्यवरांची उपस्थिती
या महत्त्वपूर्ण बैठकीस इतर बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार किरण सामंत, आमदार प्रमोद जठार, तसेच हेमंत वणजू, सौरभ मलुष्टे, विकास शेट्ये, प्रसन्न शेट्ये यांच्यासह वैश्य समाजातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या प्रलंबित प्रश्नावर तातडीने सकारात्मक तोडगा काढल्याबद्दल रत्नागिरीतील वैश्य बांधवांनी मंत्री अतुल सावे, मंत्री उदय सामंत आणि आमदार किरण सामंत यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.














