गणेशोत्सवापूर्वी रस्ता सुरू करण्याची मागणी; रस्ता पूर्ववत झाल्यास वाचणार २० ते २५ किलोमीटरचा फेरा
खेड तालुक्यातील शिवतर पंचक्रोशीला मुंबई-गोवा महामार्गासोबत जोडणाऱ्या महत्त्वाच्या नातूनगर रस्त्यावर तीन ठिकाणी दरड कोसळून तब्बल दीड महिना उलटला आहे. तरीही हा मार्ग प्रशासनाकडून अद्याप वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलेला नाही. प्रशासनाच्या या उदासीन कारभारावर स्थानिक ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
अनेक तालुक्यांना जोडणारा महत्त्वाचा पर्यायी मार्ग
नातूनगरमधून जाणारा हा मार्ग शिवतर, जामगे, आंबये आणि चिंचाळीमार्गे पुढे मंडणगड व दापोली तालुक्यांना जोडणारा एक प्रमुख पर्यायी मार्ग आहे. मात्र, दरड कोसळल्यामुळे रस्ता बंद पडल्याने स्थानिक नागरिकांना मोठ्या लांबचा फेरा मारून प्रवास करावा लागत आहे. यामुळे नागरिकांचा वेळ आणि पैसा दोन्ही नाहक वाया जात आहे.
गणेशोत्सवापूर्वी रस्ता दुरुस्तीची ग्रामस्थांची मागणी
दरड कोसळून दीड महिना झाला तरी रस्ता पूर्ववत न झाल्याने ग्रामस्थांमध्ये मोठी नाराजी आहे. स्थानिक ग्रामपंचायत व प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन आवश्यक ती कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थ सचिन सकपाळ यांनी केली आहे. याबाबत तहसीलदार आणि प्रांताधिकाऱ्यांनाही विनंती अर्ज देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.
गणेशोत्सव अत्यंत जवळ आला असल्याने संबंधित ठेकेदार आणि प्रशासनाने तातडीने घटनास्थळाची पाहणी करून दरड हटवावी, अशी मागणी जोर धरत आहे. गणेशोत्सवापूर्वी हा मार्ग खुला झाल्यास नागरिकांचे सुमारे २० ते २५ किलोमीटरचे अंतर वाचणार आहे. त्यामुळे प्रशासनाने कोणतीही दिरंगाई न करता रस्ता लवकरात लवकर सुरळीत करावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:14 25-08-2026














