Justice Prasanna B Varale Marathi School: “विकासकामांवरील खर्चाच्या ०.१% निधी दिला असता, तरी मराठी शाळा बंद पडल्या नसत्या”; सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांचा घणाघात

शिक्षणासाठीच्या घटत्या अर्थसंकल्पीय तरतुदींवर चिंता; कुंभमेळा आणि कॉरिडॉरच्या ३० हजार कोटींच्या निधीचा दाखला देत सरकारचे उपटले कान

मोठमोठ्या विकासकामांवर हजारो कोटी रुपये खर्च करणाऱ्या सरकारकडून शिक्षणासारख्या अत्यावश्यक पायाभूत सुविधांकडे होत असलेल्या दुर्लक्षावर सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांनी अत्यंत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. “हजारो कोटींच्या विकासकामांपैकी सरकारने केवळ ०.१ टक्के रक्कम म्हणजेच सुमारे ३२ कोटी रुपये जरी शिक्षणावर खर्च केले असते, तरी राज्यभरात बंद पडलेल्या १०० ते १२५ मराठी माध्यमाच्या शाळा वाचवता आल्या असत्या,” असा थेट विरोधाभास त्यांनी स्पष्ट केला.

सिंहस्थ कुंभमेळा, कॉरिडॉर प्रकल्प आणि मराठी शाळांची दुरवस्था

धुळे जिल्ह्यातील आपल्या माजी हायस्कूलमध्ये ‘स्मार्ट क्लासेस’च्या लोकार्पण प्रसंगी बोलताना न्यायमूर्ती वराळे यांनी राज्य सरकारच्या धोरणांवर भाष्य केले. नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी ३२ ते ३४ हजार कोटी रुपये आणि विविध कॉरिडॉर प्रकल्पांसाठी ११ हजार कोटी रुपयांची घोषणा सरकारकडून केली जाते. मात्र, या एकूण खर्चाच्या अगदी छोटासा हिस्सा जरी वापरला गेला, तरी राज्यातील शेकडो अडचणीत आलेल्या शैक्षणिक संस्थांना नवसंजीवनी मिळू शकते, असे त्यांनी ठामपणे मांडले. तसेच एका निवासी आश्रमशाळेत सुविधांअभावी मुलींना जमिनीवर झोपावे लागल्याने साप चावून तीन मुलींचा झालेला दुर्दैवी मृत्यू आणि एका मुलीवर सुरू असलेल्या उपचारांचा उल्लेख करत त्यांनी पायाभूत सुविधांच्या अभावाकडे लक्ष वेधले.

शिक्षणासाठीचा घटता अर्थसंकल्प ही चिंतेची बाब

गेल्या काही वर्षांत सार्वजनिक अर्थसंकल्पात शिक्षणासाठीच्या तरतुदींचे प्रमाण सातत्याने घटत असल्याबद्दल न्यायमूर्तींनी खेद व्यक्त केला. वाढत्या विद्यार्थी संख्येच्या गरजा लक्षात घेता हे बजेट वाढणे आवश्यक होते. पूर्वी केंद्र स्तरावर शिक्षणासाठी ११ टक्क्यांपर्यंत तरतूद असायची, ती वाढण्याऐवजी अर्थसंकल्पीय निधी कमी झाला आहे आणि अनेक वर्षांपासून तो योग्य प्रमाणापर्यंत पोहोचू शकलेला नाही, असेही त्यांनी निदर्शनास आणले.

“मराठी माध्यमातून शिक्षण घेतल्याने करिअरमध्ये कधीही अडथळा आला नाही”

न्यायमूर्ती प्रसन्न बी. वराळे यांनी दहावीपर्यंत मराठी माध्यमातून घेतलेल्या आपल्या शिक्षणाचा वैयक्तिक अनुभव सांगताना प्रादेशिक भाषांविषयीचा अभिमान व्यक्त केला. “मराठी माध्यमातून शिकल्यामुळे माझ्या करिअरमध्ये कधीही अडथळा आला नाही, उलट त्यामुळे माझा दृष्टिकोन अधिक समृद्ध आणि व्यापक झाला. माझ्या भाषेने मला बंधुभावाची मूल्ये शिकवली,” असे सांगताना त्यांनी १३व्या शतकातील संत ज्ञानेश्वर आणि २०व्या शतकातील ज्येष्ठ कवी सुरेश भट यांच्या रचनांचे दाखले दिले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 25-08-2026