साखर कारखान्यांचे गोडाऊन तपासण्याची मागणी
देशभरात वाढलेल्या साखरेच्या दरावरून शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केंद्र सरकारच्या धोरणांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. साखरेचे भाव वाढूनही त्याचा कोणताही प्रत्यक्ष फायदा शेतकऱ्यांना होत नसल्याने त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारने १० लाख टन साखर आयात करण्याचा निर्णय घेतला असून, ही आयात केलेली साखर ऑक्टोबर महिन्यात भारतात दाखल होईल. नेमक्या त्याच वेळी देशातील साखर कारखाने सुरू होणार असल्याने साखरेचे दर अचानक कोसळतील आणि शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होईल, असा इशारा देत राजू शेट्टी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे.
“देशात मोठा साखर घोटाळा; गोडाऊनची चौकशी करून अनधिकृत साठा जप्त करा”
राजू शेट्टी यांनी आरोप केला आहे की, देशात साखरेची खरी टंचाई नसून हा केवळ कृत्रिम तुटवडा निर्माण करून करण्यात आलेला मोठा घोटाळा आहे. “सरकारकडून दरमहा साखरेचा कोटा दिला जातो, तरीही ४५ ते ४८ लाख टन साखरेचा योग्य हिशोब लागत नाही. रिकव्हरी चोरून आणि साखरेचा साठा करून ती चढ्या दराने विकण्याचा कट शिजत आहे,” असा घणाघात त्यांनी केला. खरोखरच साखरेचा तुटवडा आहे की साठेबाजी झाली आहे, हे शोधण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी व्यापारी आणि साखर कारखानदारांच्या गोडाऊनची तसेच कागदपत्रांची सखोल तपासणी करून रेकॉर्डवर नसलेली साखर तातडीने जप्त करावी, अशी मागणी त्यांनी केली.
बांगलादेश-पाकिस्तानमध्ये चोरट्या मार्गाने साखर; अमित शाह यांच्यावर निशाणा
केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी घातलेली असतानाही चोरट्या मार्गाने बांगलादेश आणि पाकिस्तानमध्ये साखर कशी गेली? असा प्रश्न उपस्थित करत राजू शेट्टी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि प्रल्हाद जोशी यांच्यावर निशाणा साधला. “ग्राहकांच्या खिशावर दरोडा टाकला जात असून दुबईत कार्यालये असलेल्या काही मूठभर लोकांमुळे ही परिस्थिती निर्माण झाली आहे,” असे ते म्हणाले. तसेच सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी शेतकऱ्यांची थकीत एफआरपी (FRP) तातडीने द्यावी, अन्यथा वेळप्रसंगी कायदा हातात घेऊ, असा इशाराही त्यांनी दिला.
शक्तिपीठ महामार्गाला पूर्ण विरोध; तुकाराम मुंढे यांच्या निर्णयाचे समर्थन
पत्रकार परिषदेत बोलताना राजू शेट्टी यांनी शक्तिपीठ महामार्गाला आपला ठाम विरोध पुनरुच्चारित केला. “या महामार्गात २६ हजार एकर जमीन जाणार असून त्यातील १९ हजार एकर जमीन बागायती आहे. संत सावता माळी यांच्या गावातील स्मारकावरून रस्ता नेण्याचा प्रयत्न केला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला. दुसरीकडे, सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी घेतलेला निर्णय योग्य असल्याचे सांगत, सूर्यफुलाच्या तेलाच्या नावाखाली होणाऱ्या पामतेल भेसळीचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:36 25-08-2026














