Ratnagiri Slum Rehabilitation Plan: रत्नागिरीतील ७ झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन होणार; नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीचा ठराव

पालकमंत्री उदय सामंत यांचा पुढाकार; सर्वेक्षण आणि बेघर निवाऱ्याच्या निधीसाठी विषय सभेसमोर

रत्नागिरी शहरातील ७ प्रमुख ठिकाणच्या झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे आणि नागरी बेघर निवारा शाश्वत चालवण्यासाठी आवश्यक असलेल्या निधीची तरतूद करणे, या दोन महत्त्वाच्या विषयांना रत्नागिरी नगरपरिषदेच्या मंगळवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली जाणार आहे. शहरातील शासकीय जागांवर असलेल्या झोपडपट्ट्यांचे योग्य पुनर्वसन करून त्या जागा विकासकामांसाठी मोकळ्या करण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे.

सर्वेक्षण करून शासनाकडे पाठवणार आराखडा

पालकमंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार रत्नागिरी नगरपरिषदेतील शिवसेना-भाजप युतीने या पुनर्वसन प्रक्रियेची कार्यवाही सुरू केली आहे. शहरातील ७ झोपडपट्ट्यांचे सर्वेक्षण करणे, त्यांचा सविस्तर विकास आराखडा तयार करणे आणि तो अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवणे, यासाठी सर्वसाधारण सभेची औपचारिक मंजुरी घेतली जाणार आहे. तसेच या संपूर्ण सर्वेक्षणासाठी आणि प्रक्रियेसाठी येणाऱ्या खर्चालाही सभेत मान्यता दिली जाईल. झोपडपट्टी पुनर्वसनामुळे नागरिकांना हक्काचे घर मिळेलच, शिवाय मोकळ्या होणाऱ्या शासकीय जागांचा शहराच्या विकासासाठी उपयोग होणार आहे.

नागरी बेघर निवाऱ्याच्या शाश्वततेसाठी निधीची तरतूद

रत्नागिरी शहरातील शनिवार आठवडा बाजाराजवळ नगरपरिषदेचा ‘नागरी बेघर निवारा’ चालवला जातो. गेल्या वर्षी एका स्वतंत्र संस्थेमार्फत या निवाऱ्याचे निरीक्षण करण्यात आले होते, ज्यामध्ये या निवाऱ्याच्या कामकाजाबाबत अत्यंत उत्कृष्ट अभिप्राय देण्यात आला होता. या संस्थेने सुचवलेल्या शिफारशींनुसार, हा बेघर निवारा कायमस्वरूपी व शाश्वत रीतीने सुरू राहण्यासाठी त्याच्या देखभाल व व्यवस्थापनासाठी (Maintenance & Management) स्वतंत्र निधीची तरतूद करण्याचा विषयही या सर्वसाधारण सभेसमोर मंजुरीसाठी ठेवण्यात आला आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:36 25-08-2026